Kolhapur News: खिद्रापूरमधील शिलालेखावर सापडले कोरीव अवशेष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 05:14 PM2023-05-31T17:14:41+5:302023-05-31T17:15:24+5:30
कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिराच्या स्वर्ग मंडपात रोमन काळातील रोमन व्यापाराचा नाइन मेन्स माॅरीस व ...
कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिराच्या स्वर्ग मंडपात रोमन काळातील रोमन व्यापाराचा नाइन मेन्स माॅरीस व पंचखेलीया या खेळांचे शिलालेखावर कोरीव अवशेष सापडले आहेत. त्यामुळे मंदिरात रोमन व्यापारी, पर्यटक येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक येथील प्राचीन पटखेळ संवर्धन मोहिमेचे प्रमुख सोज्वळ साळी व रत्नागिरी येथील स्नेहल बने यांनी हे अवशेष शोधले आहेत.
खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर हेमाडपंती शिल्पकला आहे. सुमारे एक एकर क्षेत्रात बाराव्या शतकातील शिवमंदिर असून, शिल्पकला, आभूषणे, दिग्पाल या कलांनी नटलेले मंदिर पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. केंद्रीय पुरातत्व विभागाकडे या मंदिराची जबाबदारी आहे.
पर्यटकासह विविध इतिहास संशोधक या मंदिराला भेट देऊन अधिक संशोधन करण्याचा प्रयत्न करत असतात. नाशिक पटखेळ संवर्धन मोहिमेचे प्रमुख साळी व बने यांना कोपेश्वर मंदिरातील स्वर्ग मंडपातील शिलावर पटखेळांचे अवशेष दिसल्याने संशोधनातून रोमन काळातील पटखेळ असल्याचे सिद्ध झाले आहे.
कोरीव अवशेष
पंचखेलीया हा पटखेळ बौद्धिक आणि करमणुकीचा खेळ आहे. रोमन काळाच्या आधीपासून भारतात खेळ खेळला जातो. देश, विभागानुसार या खेळाचे नाव बदलत असते. कोपेश्वर मंदिरातील शिलालेखावर पटखेळाचे कोरीव अवशेष आहेत. - शशांक चोथे, कोपेश्वर मंदिर व इतिहास अभ्यासक