‘म्हैसाळ’प्रकरणी औषध विक्रेत्यास अटक
By admin | Published: March 16, 2017 01:17 AM2017-03-16T01:17:53+5:302017-03-16T01:21:25+5:30
संशयितांची संख्या बारावर : खिद्रापुरेने औषधसाठा कृष्णा नदीत टाकला
मिरज : म्हैसाळ येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे यास गर्भपातासाठी औषध पुरवठा करणाऱ्या भरत शोभाचंद गटागट (वय ४८, रा. कोल्हापूर रोड सांगली) या औषध वितरकास पोलिसांनी बुधवारी अटक केल्याने या प्रकरणातील संशयितांची संख्या बारावर पोहोचली आहे. न्यायालयाने गटागट यास तीन दिवस पोलिस कोठडी दिली. दरम्यान, डॉ. खिद्रापुरे याने शिरोळ
तालुक्यात कृष्णा नदीत टाकून दिलेल्या औषध साठ्याचा पोलिसांनी शोध घेतला.
मणेराजुरी येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा अनैसर्गिक गर्भपात व तिच्या मृत्यूप्रकरणी डॉ. खिद्रापुरे अटकेत आहे. खिद्रापुरे यास अवैध गर्भपातासाठी औषध पुरवठा करणाऱ्या माधवनगर येथील एका औषध विक्रेत्यास पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. सांगलीतील औषध वितरक भरत गटागट हा डॉ. खिद्रापुरे यास प्रतिबंधित औषधांचा पुरवठा करीत असल्याचे निष्पन्न
झाल्याने त्यास पोलिसांनी अटक केली. गटागट यास न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यास दि. १८ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
खिद्रापुरे याने गुन्हा दाखल झाल्यानंतर फरारी होताना औषध साठा शिरोळ तालुक्यात औरवाड परिसरात कृष्णा नदीपात्रात टाकल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी कृष्णा नदी पात्रात औषधांचा शोध घेतला, मात्र औषधे सापडली नाहीत.
खिद्रापुरेकडून गर्भपात करणाऱ्या महिलांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, गर्भपात करणाऱ्या काही कुटुंबातील सदस्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. गर्भलिंग निदान करणारा शिरोळ तालुक्यातील एक डॉक्टर खिद्रापुरे याच्याशी सबंधित असल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. लिंगनिदान व गर्भपातासाठी रुग्ण आणणाऱ्या चार एजंटांना पोलिसांनी अटक केली असून, आणखी दोन एजंटांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
मोटारसायकल जप्त
मृत विवाहिता स्वाती जमदाडे हिचा पती प्रवीण जमदाडे याची मोटारसायकल जप्त केली. गर्भपात करण्यासाठी प्रवीण याने स्वातीला मोटारसायकलवरून म्हैसाळला नेले असल्याने याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांत मोटारसायकल जप्त केली. डॉ. खिद्रापुरे याच्या पोलिस कोठडीची शुक्रवारी मुदत संपत असून, अधिक तपासासाठी त्याची पोलिस कोठडी वाढविण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार आहे.
कार्यकक्षा : भारती हॉस्पिटलच्या विविध प्रकारच्या बेकायदेशीर नोंदणी तसेच रुग्णालयाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास ही समिती करेल. अशा प्रकारच्या घडणाऱ्या घटनांसाठी कारणीभूत सरकारी यंत्रणांमधील दोष ही समिती शोधेल आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना देखील शासनाला सुचवेल.
चौकशी समिती नेमणार
मुंबई : म्हैसाळ येथे झालेल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाची चौकशीसाठी सांगलीच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी केली.
याच महाविद्यालयाचे स्त्रीरोग विभागाचे प्राध्यापक, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी, अन्न व औषधी प्रशासनाचे पुणे येथील सहआयुक्त, युनिसेफचे पुण्याचे वरिष्ठ सल्लागार डॉ.मधुसुदन कर्नाटकी हे या समितीचे सदस्य तर सांगलीचे जिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असतील. समितीने एक महिन्याच्या आत राज्य सरकारला अहवाल सादर करायचा आहे.
म्हैसाळ येथील भारती हॉस्पिटलमध्ये स्वाती प्रवीण जमदाडे या गर्भवती महिलेच्या मृत्यूबाबत तांत्रिक बाबींची सखोल चौकशी ही समिती करेल. तसेच, या व इतर अवैध गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची उपलब्धता तपासून संबंधित खासगी डॉक्टरांना या औषधांचा पुरवठा स्रीरोगतज्ज्ञ नसताना कोणत्या स्रोतातून झाला याची चौकशी समिती करेल.