‘रेमडेसिविर’ प्रकरणी परिचारिका गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:24 AM2021-05-17T04:24:21+5:302021-05-17T04:24:21+5:30
कोल्हापूर : कोरोना रुग्णासाठी जीवनदायी ठरणाऱ्या ‘रेमडेसिविर’ औषधाचे काळ्या बाजारात जादा दराने विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. ...
कोल्हापूर : कोरोना रुग्णासाठी जीवनदायी ठरणाऱ्या ‘रेमडेसिविर’ औषधाचे काळ्या बाजारात जादा दराने विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. त्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी शिवाजी उद्यमनगर परिसरातील एका हॉस्पिटलमधून एका परिचारिकास अटक केली. मनीषा तानाजी रोटे (वय ३०, रा. रोटे गल्ली, कागल) असे त्या परिचारिकाचे नाव असल्याची माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सीताराम डुबल यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना महामारीचा कहर होत असताना जिल्ह्यात ‘रेमडेसिविर’ या औषधाची प्रचंड टंचाई भासत आहे. कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत काळ्याबाजारात जादा दराने रेमडेसिविर औषध विक्री करणाऱ्या दोन टोळ्यांचा छडा आतापर्यंत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने लावला आहे. या रॅकेटमधील प्रकाश गोते याच्यासह तिघांना यापूर्वीच अटक केली आहे. संशयित गोते हा उद्यमनगरातील ज्या रुग्णालयात कामाला होता, त्याच रुग्णालयातील कागदपत्रे पोलिसांनी तपासली. त्यावेळी तेथील परिचारिका मनीषा रोटे हिच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार तिच्यावर चार दिवसांपूर्वी अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती पो. नि. डुबल यांनी दिली.