तलवारीने केक कापण्याचे प्रकरण: पालकमंत्री केसरकर, जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
By समीर देशपांडे | Published: November 28, 2022 02:33 PM2022-11-28T14:33:52+5:302022-11-28T14:34:24+5:30
पोलिसांनी कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार
कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या वाढदिवशी तलवारीने केक आपल्या प्रकरणी त्या ठिकाणी उपस्थित असलेले पालकमंत्री दीपक केसरकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आज, सोमवारी जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी करण्यात आली.
रविकिरण इंगवले म्हणाले, राजेश क्षीरसागरनी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी मी शिवसेनेची खिंड लढवणार आहे. सर्वसामान्यांना एक न्याय आणि पुढाऱ्यांना एक न्याय असे पोलीस खात्याने करू नये आणि म्हणूनच क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
विजय देवणे म्हणाले, पालकमंत्री केसरकर आणि जिल्हाधिकारी हे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या समोर गुन्हा घडला असल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा. संजय पवार यांनी याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. यावेळी दिपाली शिंदे, प्रशांत पाटील, विशाल देवकुळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.