एटीएम फोडून साडेआठ लाखांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:06 AM2017-08-03T01:06:20+5:302017-08-03T01:06:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कावळा नाका ते मार्केट यार्ड रस्त्यावर मुक्त सैनिक वसाहत येथील रत्नाकर बँकेचे एटीएम सेंटर चोरट्यांनी फोडून साडेआठ लाखांची रोकड लंपास केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. रस्त्यालगत असलेल्या या एटीएम सेंटरचे मशीन गॅसकटरच्या साहाय्याने कापून त्यातील शंभर, पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा चोरून चोरटे पसार
झाले. गॅसकटरमुळे मशीन आतून पूर्ण जळाले आहे.
अधिक माहिती अशी, ताराबाई पार्क येथील रत्नाकर बँकेचे (आरबीएल) एटीएम सेंटर मुक्त सैनिक वसाहत येथे मुख्य रस्त्याकडेला आहे. त्याच्या शेजारी टुरो ट्रॅव्हल्स अॅँड टूर्सचे कार्यालय आहे. गेल्या पाच वर्षांपासून एजीएस ट्रॅँझेशन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, मुंबई या कंपनीचे एजीएस एटीएम मशीन आहे. कंपनीचे कॅशिअर सुनील चौगुले व प्रशांत मुचंडी यांनी मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मशीन तपासले असता त्यामध्ये ५ लाख ५० हजार रुपये होते. त्यामध्ये आणखी तीन लाखांची कॅश भरली. त्यामुळे सुमारे साडेआठ लाख रुपये एटीएम मशीनमध्ये होते. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पुन्हा कॅशिअर चौगुले व मुचंडी कॅश भरण्यासाठी या ठिकाणी आले. बाहेरून एटीएम सेंटरचे शटर बंद असल्याने त्यांना शंका आली. शटर उघडून पाहिले असता आतमध्ये एटीएम मशीन फोडलेले दिसले.
ही बाब त्यांनी बँकेचे व्यवस्थापक महादेव चिकुर्डेकर यांना मोबाईलवरून कळविली. चिकुर्डेकर यांनी काही प्रतिनिधींना तत्काळ घटनास्थळी पाठविले. एटीएम कंपनीचे प्रतिनिधी विनय हसबनीस आले. त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला फोनवर चोरीची माहिती दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे व शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यापाठोपाठ शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आले. त्यांनी एटीएम सेंटरची पाहणी केली. झेबा श्वान घटनास्थळी आले. मशीन जळाल्यामुळे चोरट्यांच्या हातांचे ठसे मिळाले नाहीत. तसेच दुर्गंधी सुटल्याने श्वान माघारी परतले. पोलीस शहरातील व शहराबाहेरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या प्रकरणी एटीएम कंपनीचे फिल्ड आॅफिसर विनय हसबनीस यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
रात्री दीड वाजता शेवटची रक्कम काढली
एटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीची हार्ड डिस्क सुस्थितीत असल्याने त्याचे चित्रीकरण पाहिले असता मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास एका तरुणाने सहा हजार रुपये एटीएममधून काढल्याचे दिसत आहे. त्यानंतर पहाटे तीनच्या पुढे पूर्णत: अंधार दिसत आहे. तिघा-चौघा चोरांचे हे कृत्य असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
एजीएस ट्रॅँझेशन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, मुंबईने बसविलेल्या या एटीएम मशीनची किंमत साडेचार लाख रुपये आहे. जर्मनीतून ते आणले आहे. या मशीनला कोणतीही सुरक्षा नाही. अलार्म नाही. या ठिकाणी सुरक्षारक्षकही नाही. चोरीनंतर पोलिसांनी एटीएम कंपनीच्या व बँकेच्या प्रतिनिधींकडे चौकशी केली असता दोघांनीही सुरक्षारक्षक नियुक्तीची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी शहरातील सर्व बँकांना व एटीएम सेंटर कंपन्यांना सुरक्षारक्षक नियुक्ती करण्यासंबंधी पोलीस प्रशासनाकडून नोटिसा पाठविल्या आहेत. इतकी मोठी रक्कम एटीएम सेंटरमध्ये ठेवली जाते; परंतु तिथे सुरक्षारक्षक नियुक्त केला जात नाही. याबद्दल पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींची कानउघाडणी केली.