आमरोळीत काजू कारखान्यावर वीज कोसळून भीषण आग; ९० लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2023 10:04 PM2023-05-29T22:04:43+5:302023-05-29T22:06:44+5:30
रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
- निंगाप्पा बोकडे
चंदगड : वीज कोसळून अचानक लागलेल्या आगीत आमरोळी येथील श्रीराम शेतीमाल प्रक्रिया काजू कारखान्याला आग लागून सुमारे ९० लाखांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. गडहिंग्लज येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने ८०० ते ९०० पोती काजू बिया ( ९० टन ) काजू यासह लाकूड, पत्रे आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. याचवेळी काजू गोदमावर वीज कोसळून काजू पोत्यांनी पेट घेतला. पण त्यावेळी ते लक्षात आले नाही. सोमवारी दुपारी आगीने रौद्ररूप घेतल्यावर गडहिंग्लज येथील अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र काजूने इतका पेट घेतला की, पाण्याचा मारा अपुरा पडू लागला. यामध्ये सुमारे ८०० ते ९०० काजू पोती, गोडाऊनचे ७५ सिमेंट पत्रे, २५ लाकडी खांब असे साहित्य जळून खाक झाले.
घटनेचा पंचनामा तलाठी रुपाली कांबळे, पोलिस पाटील मारुती नाईक, धोंडीबा नाईक, विजयकुमार कांबळे, उत्तम वाईगडे, सुरेश वाईंगडे, प्रकाश वाईंगडे यांनी केला. घटनेची वर्दी कारखान्याचे चेअरमन पांडुरंग राजाराम मंडलिक यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे.