कॅसिनो जुगारात जिंकलेले ३२ लाख न देता केली फसवणूक, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 11:53 AM2022-05-12T11:53:20+5:302022-05-12T11:54:33+5:30
जिंकलेले रक्कम संबंधितांकडे मागणी केली असता त्यांनी देण्यास संशयितांनी टाळाटाळ केली. तसेच सुतार यांना दमदाटी व शिवीगाळ करून धमकी दिली.
पेठवडगाव : कॅसिनो जुगारात जिंकलेले ३२ लाख ५० हजार न देता फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध वडगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रार अर्जावरून चौकशी करून गुन्हा नोंद करण्यात आला.या प्रकरणी एकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणी अक्षय माने, चंद्रकांत जाधव (दोघे रा. वडगाव), काबूल, मोमीन (पूर्ण नाव व पत्ता मिळालेला नाही),मोहन व महेंद्रभाई गणात्रा व अनिल निर्मळे, अमित ठक्कर, जुगार कंपनी मालक आदींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत फिर्याद जीवन बापूसोा सुतार (खोचीकर) याने दिली.
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार मुख्य संशयित अक्षय माने व त्याचा कामगार चंद्रकांत जाधव यांनी मोबाईलवरील वीन लकी गो ऑनलाईन कॅसिनो जुगार सुरू केला होता. यामध्ये सुतार याने २० जानेवारी ते २१ जानेवारीला हजार रुपये खर्चून ३२ लाख ५० हजार रुपये जिंकले होते. ही रक्कम संबंधितांकडे मागणी केली असता त्यांनी देण्यास संशयितांनी टाळाटाळ केली. तसेच सुतार यांना दमदाटी व शिवीगाळ करून धमकी दिली.
त्यामुळे सुतार यांनी चौकशी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार फिर्यादीवरून फसवणूक, अन्यायाची धमकी आदी कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील करीत आहेत.