गडहिंग्लज शहरातील रस्ते-वस्त्यांची जातिवाचक नावे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:24 AM2021-07-28T04:24:20+5:302021-07-28T04:24:20+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील रस्ते व वस्त्यांची जातिवाचक नावे रद्द करून त्यांना थोरपुरुष आणि समाजसुधारकांची नावे देण्याचा निर्णय नगरपालिकेच्या ...
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील रस्ते व वस्त्यांची जातिवाचक नावे रद्द करून त्यांना थोरपुरुष आणि समाजसुधारकांची नावे देण्याचा निर्णय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी होत्या.
कोरोना महामारीमुळे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही सभा पार पडली. विरोधी पक्षनेते हारुण सय्यद, राष्ट्रवादीच्या नगरसेविका शुभदा पाटील व सावित्री पाटील, जनता दलाचे उदय पाटील वगळता उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्यासह सर्व नगरसेवक व विभागप्रमुख उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील रस्ते आणि वसाहतींची जातिवाचक नावे रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुसार गडहिंग्लज शहरातील १६ रस्ते व वस्त्यांची नावे रद्द करण्यास सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.
शहरातील वाहतुकीची दैनंदिन कोंडी दूर करण्यासाठी डॉक्टर्स कॉलनीसह साधना बुक स्टॉल ते शिवाजी बँक, शिवाजी बँक ते गंगा मेडिकल, अहिल्याबाई होळकर चौक ते टिळक पथ, बसवेश्वर चौक ते नेहरू चौक या मार्गावर सम-विषम पार्किंग करण्यात यावे, अशी सूचना नरेंद्र भद्रापूर यांनी केली. त्याला मंजुरी देऊन याबाबतचा प्रस्ताव पोलीस खात्याकडे पाठविण्याचा निर्णय झाला.
चर्चेअंती विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.
चौकट :
ही नावे बदलण्याचा झाला निर्णय
कुंभार गल्ली, नवीन कुंभार वसाहत, सुतार गल्ली, बुरुड गल्ली, कासार गल्ली, ढोर वसाहत, माळी गल्ली, चांबार गल्ली, न्हावी बोळ, वड्ड वसाहत, बेरडवाडा, धनगर गल्ली, सुतारवाडा, गवळीवाडा, इराणी वसाहत व पिंजारी गल्ली ही जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय सभागृहात एकमताने झाला.
- नगरपालिका : २६०७२०२१-गड-१०