गावांची, रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:18 AM2021-07-20T04:18:51+5:302021-07-20T04:18:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुरुंदवाड : राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देण्याचे आदेश राज्य शासनाने राज्यातील महानगरपालिका, नगरपालिकांना दिले आहेत. त्यानुसार येथील पालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली असून, शहरातील जातीवाचक गल्ल्या, प्रभाग किमान कागदोपत्री तरी नामशेष होणार आहेत.
शहरात जाती आणि व्यवसायावरुन गल्ली, वस्त्यांना पारंपरिक नावे आहेत. एखाद्या व्यक्तीच्या आडनाव अथवा व्यवसायावरुन त्याचा राहण्याचा पत्ता सांगितला जातो. त्यामध्ये ब्राम्हणपुरी, सुतार गल्ली, कुंभार गल्ली, शिकलगार वसाहत, मुस्लिम गल्ली, दलित वस्ती, पाटील गल्ली अशा पारंपरिक नावाने वस्ती अथवा गल्लीला ओळखले जाते.
मात्र, जातीवाचक नाव देणे पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला भूषणावह नसल्याने जातीवाचक नावे बदलून वस्ती, गल्ली, रस्त्यांना महापुरुष व लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देण्याचे आदेश दिले आहेत. यातून सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढविण्याचा शासनाचा उद्देश आहे. त्यामुळे जिल्हा समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे यांनी महापालिका, पालिका प्रशासनाला पत्र पाठवून शासन निर्णयाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे पालिका मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सर्व नगरसेवकांना शासन आदेशाची प्रत पाठवून प्रभागात वस्ती अथवा रस्त्यांना जातीनिहाय नावे असल्यास माहिती देण्यास सांगितले आहे. प्रत्येक समाजाला आपापल्या जातीचा, जातीनिहाय व्यवसायाचा अभिमान आहे. शासनाच्या या निर्णयामुळे समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे बोलण्यात जातीवाचक गल्लीची ओळख होत असली तरी कागदोपत्री अशी नावे गायब होणार आहेत.
------------------
कोट - शासन आदेशानुसार शहरातील जातीवाचक रस्ते, गल्लींची नावे यांचा शोध घेतला जात आहे. त्यासंदर्भात सर्व नगरसेवकांना शासन आदेशाची पत्र पाठवून माहिती देण्यास सांगितले आहे. ही माहिती संकलित करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.
- निखील जाधव, मुख्याधिकारी, नगर परिषद कुरुंदवाड