जातीचे राजकारण रंग दाखवणार
By admin | Published: October 1, 2014 10:37 PM2014-10-01T22:37:01+5:302014-10-02T00:18:06+5:30
नाराजांकडे लक्ष : काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर शिवसेना, स्वाभिमानीचे आव्हान
संदीप बावचे-- शिरोळ--विधानसभा मतदारसंघासाठी चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असले तरी कॉँग्रेस, राष्ट्रवादीसमोर शिवसेना व स्वाभिमानीचे कडवे आव्हान उभे राहिले आहे. बंडखोरी टाळण्यात राष्ट्रवादी व कॉँग्रेसला यश आले आहे. मात्र, या दोन्ही पक्षांतील नाराज गटाने शिवसेनेचे उमेदवार उल्हास पाटील यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने पहिल्या टप्प्यातच विधानसभा निवडणुकीत रंगत आली आहे. येथे जातीचे राजकारण रंग दाखवणार, अशी चिन्हे आहेत. मतदारसंघात जैन, लिंगायत विरुद्ध मराठा अशा जातीच्या राजकारणाने या निवडणुकीत एकदम उसळी घेतली आहे..
काँग्रेसचे आमदार सा. रे. पाटील, सेनेचे उल्हास पाटील, भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकर मादनाईक आणि राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर हे रिंगणातील प्रमुख उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादीचे धैर्यशील माने, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव व ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील या मातब्बरांनी माघार घेतली. त्यांनी माघार घेऊन मराठा समाजाचा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या उल्हास पाटील यांना पाठिंबा दिला. महायुती व आघाडीत घटस्फोट झाल्यानंतर शिरोळ तालुक्यातीलही अनेक राजकीय संदर्भ बदलले. पक्षाकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता रंगली. कॉँग्रेसकडून विद्यमान आमदार सा. रे. पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
तर राष्ट्रवादीकडून पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण? यावरून राजेंद्र पाटील-यड्रावकर व जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांच्यात चांगलीच चुरस निर्माण झाली. अखेर यड्रावकर यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन बाजी मारली. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे म्हणजेच पर्यायाने खासदार राजू शेट्टी यांच्यापुढे उल्हास पाटील की सावकर मादनाईक या दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायचा, हा पेचप्रसंग निर्माण झाला होता. या दोघांनीही जोरदार तयारी केली होती. मात्र, स्वाभिमानीने उमेदवारी डावलल्यामुळे उल्हास पाटील यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली. यामुळे स्वाभिमानी पक्षात चांगलाच राजकीय भूकंप झाला. पाच वर्षांपूर्वीच सावकर मादनाईक यांना २०१४ ची उमेदवारी देण्याचा पक्षातील कोअर समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. प्रचार कार्यक्रमात शिवसेनेचे उमेदवार उल्हास पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून तालुक्यात चांगले काम केले असताना स्वाभिमानीने विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.
गेली दहा वर्षे आघाडी म्हणून शिरोळ तालुक्यात विद्यमान आमदार डॉ. सा. रे. पाटील व राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर या गुरू-शिष्याने एकत्रित काम केले आहे. मात्र, विधानसभेच्या या निवडणुकीत दोघेही आता एकमेकांविरुद्ध दोन हात करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर स्वाभिमानीचे बळ वाढले, असे चित्र असताना महायुतीतील घटस्फोटामुळे शिवसेना स्वाभिमानीपासून वेगळी झाल्यामुळे मतविभागणी होणार का? शिवाय उल्हास पाटील यांच्या उमेदवारीमुळे स्वाभिमानीतील मतांचीही विभागणी होणार का? हा प्रश्न सध्या चर्चेत असला तरी मतविभागणीचा फायदा कोणाला मिळणार आणि शिरोळचा ‘गड’ कोण जिंकणार, याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.