नामनिर्देशनपत्रासोबतच आता जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:27 AM2021-02-24T04:27:25+5:302021-02-24T04:27:25+5:30

कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक राखीव जागेवरून लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...

Caste validity certificate is now mandatory along with the nomination paper | नामनिर्देशनपत्रासोबतच आता जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक

नामनिर्देशनपत्रासोबतच आता जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक

Next

कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक राखीव जागेवरून लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत कार्यवाही ठेवण्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासकांना निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या ‘कलम ५ ब’ मधील तरतुदीनुसार उमेदवाराने नामनिर्देशनपत्रासोबत जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास शासनाने वेळोवेळी सवलत दिली होती, त्यानुसार सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१ द्वारे केलेल्या सुधारणेनुसार ही सवलत दि. ३० जून २०१९ पर्यंत लागू होती. दिनांक २२ ऑगस्ट २०१९च्या अध्यादेशानुसार या सवलतीची मुदत दि. ३० जून, २०२० पर्यंत वाढविली होती. मात्र, या अध्यादेशाचे रूपांतर अधिनियमात झालेले नाही. त्यामुळे आता उमेदवाराने नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक झाले आहे.

राखीव जागांवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्यामुळे उमेदवारांनी त्यांची जातवैधता प्रमाणपत्रे वेळीच काढून घेणे आवश्यक आहे. या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने सूचना दिल्या असून त्यानुसार योग्य ती कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, असे म्हटले आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे आदेश-

१. राखीव जागांवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक. उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्रे वेळीच काढून घेणे आवश्यक.

२. इच्छुक उमेदवारांचे अर्ज आल्यास तत्काळ जातपडताळणी समितीकडे पाठविण्यात यावेत.

३. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी जातपडताळणी समितीशी योग्य तो समन्वय साधून इच्छुक उमेदवारांच्या अर्जामध्ये काही उणिवा आढळून आल्यास त्याची माहिती संबंधित उमेदवारास देऊन त्याची त्वरित पूर्तता केली जाईल, जात वैधता प्रमाणपत्राअभावी एकही पात्र इच्छुक उमेदवार वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

Web Title: Caste validity certificate is now mandatory along with the nomination paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.