कत्तलखान्याकडे जाणारा जनावरांचा टेम्पो पकडला
By Admin | Published: July 17, 2016 11:40 PM2016-07-17T23:40:37+5:302016-07-17T23:49:59+5:30
कोळपेतील घटना : वासराचा गुदमरून मृत्यू; १२ गाई, तीन बैलांची सुटका; चौघांवर गुन्हा
वैभववाडी : कत्तलखान्याकडे १६ जनावरे घेऊन जाणारा टेम्पो शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री कोळपे येथे पकडून दिला. माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे व नगरसेवक संतोष पवार यांनी ही कामगिरी केली असून, टेम्पोत कोंबलेल्या १६ जनावरांमध्ये १२ गाई, तीन बैल व एका वासराचा समावेश होता. त्यापैकी वासराचा गुदमरून टेम्पोत मृत्यू झाला.
टेम्पो पोलिस ठाण्याच्या आवारात आणल्यानंतर राजापुरातील शिवसेनेच्या शाखाप्रमुखाने प्रकरण दडपण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावून रात्री दोन वाजता दलालासोबत पोलिस निरीक्षकांच्या बंगल्याचा दरवाजाही ठोठावला. मात्र, पोलिस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांच्या आदेशाने दलालासह कोल्हापुरातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून सायंकाळी चौघांना अटक करण्यात आली. गेल्या सव्वा महिन्यातील जनावरांचा टेम्पो पकडण्याच्या दुसऱ्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघप्रमुख माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, नगरसेवक संतोष पवार शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास खारेपाटणहून उंबर्डेकडे येत असताना कोळपेनजीक मागील बाजूला नंबरप्लेट नसलेला संशयास्पद टेम्पो आढळला. त्यामुळे त्यांनी टेम्पो थांबविण्याचा प्रयत्न केला. टेम्पोचालकाने त्यांच्याजवळ थांबण्याचे नाटक करून निसटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी तत्काळ पोलिसांना दूरध्वनीवर माहिती देत टेम्पो अडविला. त्यावेळी टेम्पोत कोंबलेल्या गाई आढळून आल्या. त्यामुळे त्यांनी टेम्पो पोलिस ठाण्याकडे घ्यायला सांगितले. ते टेम्पो घेऊन अर्ध्या रस्त्यात असताना पोलिस तेथे आले.
संशयास्पद टेम्पोबाबत माहिती मिळताच पोलिस हवालदार राजेंद्र जामसंडेकर, पोलिस शिपाई शेटे यांचे पथक तातडीने उंबर्डेकडे जाऊन कारवाई केली. रात्री दीडच्या सुमारास टेम्पो पोलिस ठाण्याच्या आवारात आणला. टेम्पोमध्ये दलाल, चालक व दोन सहकाऱ्यांसह १२ गाई, तीन बैल व एका वासराचा समावेश होता. तेव्हा जनावरांचा दलाल बाबासाहेब सीताराम पाटील (वय ४५, रा. माळ्याची शिरोली, ता. करवीर, कोल्हापूर) याने मांडवलीचा सूर आळविण्यास सुरुवात केली. प्रकरण मिटविण्यासाठी दलाल पाटील कधी पोलिसांच्या, तर कधी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मागे मागे फिरत होता. मात्र, पोलिसांनी ताठर भूमिका घेतल्याने दलाल आणि त्याच्या मध्यस्थांचा नाइलाज झाला.
दरम्यान, याप्रकरणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक रावराणे, मंगेश लोके यांनी पोलिस निरीक्षक बुलबुले यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली. (प्रतिनिधी)
अटक केलेले कोल्हापूरचे
पोलिस हवालदार राजेंद्र जामसंडेकर यांच्या तक्रारीनुसारच कोल्हापूर-करवीर येथील माळ्याची शिरोलीचे दलाल बाबासाहेब पाटील (वय ४५), टेम्पोचालक धनाजी रामचंद्र पाटील (४५), गणेश रंगराव देशमुख (१८), रणजित संभाजी देशमुख (३५) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून टेम्पोसह (एमएच १०; झेड- १८७९) दोन लाख ३३ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याचा तपास पोलिस निरीक्षक बुलबुले व हवालदार जयशंकर धुरी करीत आहेत.