अंगणवाडीसेविका वर्गात; मुलं घरात
By admin | Published: May 26, 2015 12:36 AM2015-05-26T00:36:22+5:302015-05-26T00:47:33+5:30
आजऱ्यातील परिस्थिती : सर्वांना उन्हाळ्याची सुटी, अंगणवाड्या मात्र सुरू
कृष्णा सावंत - पेरणोली -कडक उन्हाळ्यात सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी असताना अंगणवाडी मात्र सुरू आहे. अंगणवाडीच्या मुलांनीही दांडी मारली असून आजरा तालुक्यातील सर्वच अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडीसेविका वर्गात अन् मुलं घरात अशी परिस्थिती आहे.
सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी पडून महिना उलटला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शाळांना सुटी दिली जाते. परंतु कोवळ्या अंगणवाडीमधील मुलांना सुटी दिली जात नसल्याने मुलांनी स्वत:हून सुटी घेतली आहे. त्यामुळे आजरा तालुक्यातील सर्वच अंगणवाड्यांमध्ये मुलांविना अंगणवाड्या भकास दिसू लागल्या आहेत.
अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस मुलांविना शाळा चालवत आहेत. लिखाणात मग्न झाल्या आहेत. मुलं अंगणवाडीला येत नसल्याने सेविका, मदतनीस यांच्यातही कामाचा चुकारपणा वाढला आहे. केवळ हजेरी लावून जात आहेत. प्रशासनाकडूनही अघोषित सुटी समजली जात आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही मुलांच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. मे महिना म्हणजे मुलांचे आजोळी जाण्याचे दिवस, बहुतांश मुलं आजोळी गेली आहेत. शासनानेही अधिकृत मे महिन्यात सुटी देण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी आजरा पंचायत समितीने अंगणवाड्यांना सुटी देण्याचा ठराव व मागणी केली होती. मुलांना उन्हातून शाळेत जाणे सहन होत नाही त्यामुळे अंगणवाड्यांना अधिकृत सुटी देण्याची गरज निर्माण झाली आहे.
उन्हाचा तडाखा
उन्हाच्या तडाख्यामुळे मुलं अंगणवाडीत जायला तयार नाहीत. त्यामुळे अंगणवाडीसेविकांना केवळ हजेरी लावून यावे लागत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे पालकही सोडायला व आणायला कंटाळत आहेत.