जिल्ह्यात तृणभक्षी वन्यप्राणी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2016 12:03 AM2016-10-07T00:03:20+5:302016-10-07T00:03:42+5:30
वीस टक्के वाढ : वन कायद्याचा धाक आणि उपाययोजनांचा परिणाम
महालिंग सलगर--कुपवाड सह्याद्रीचे डोंगर आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वन विभागाच्या परिक्षेत्रात वन्यजीवांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वीस टक्के वाढ झाली आहे. वन विभागाच्या उपाययोजना आणि वन कायद्याच्या धाकामुळे ही वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील वन विभागाच्या सर्वेक्षणात मांसभक्षी प्राण्यांपेक्षा तृणभक्षी प्राण्यांची वाढ अधिक प्रमाणात होऊ लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यात वन विभागाच्या अधिपत्याखाली ४२ हजार हेक्टर वनक्षेत्र कार्यरत आहे. हे वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत पाच टक्के आहे. या वनक्षेत्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरील वृक्ष आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वनांचा समावेश आहे. या वृक्षांमध्ये लिंब, बाभूळ, खैर, बोर, करंज आदी वृक्षांचा समावेश आहे.
वन विभागाच्या अखत्यारीत जिल्ह्यात एका बाजूला सधन आणि एका बाजूला दुष्काळी पट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळेच जिल्ह्यात या प्रकारचे वृक्ष आढळून येतात. या वनक्षेत्रात वन विभागाच्या उपाययोजना आणि वन कायद्याच्या धाकामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामध्ये मांसभक्षी प्राण्यांपेक्षा तृणभक्षी प्राण्यांची वाढ अधिक प्रमाणात होऊ लागली आहे.
जिल्ह्यात शिराळा, खानापूर-विटा, आटपाडी, जत, कडेगाव, सांगली या वन परिक्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक प्राणी असलेल्या वन परिक्षेत्रामध्ये शिराळा तालुक्याचा क्रमांक लागतो, तर सर्वात कमी संख्या असलेल्या वन परिक्षेत्रामध्ये सांगलीचा समावेश होतो. वन विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या प्रगणनेवेळी मागीलवर्षी पाचशे वन्यप्राणी आढळून आले, तर यंदा करण्यात आलेल्या प्रगणनेवेळी ६४८ वन्यप्राणी आढळून आले. जंगलातील पाणवठे आणि वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या ठिकाणावरील प्राण्यांच्या पायांच्या ठशांवरून ही गणना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वेक्षणात रानडुक्कर, ससा, वानर, माकड, कोल्हा, साळिंदर, गवा, लांडगा, सांबर, सकाळवीट या वन्यप्राण्यांचा समावेश आढळून आला.
तसेच जिल्ह्यात वन्यजीव विभागाकडून चांदोली आणि सागरेश्वर अभयारण्यात केलेल्या गणनेत बिबट्या, गवा, लांडगा, कोल्हा, हरिण, सांबर आदीप्रकारच्या सातशेहून अधिक वन्यजीवांबरोबरच वाघाचे अस्तित्वही आढळून आल्याचे दिसून आले आहे. वन्यजीव विभागाच्या गणनेत तृणभक्षीबरोबरच मांसभक्षी प्राण्यांतही चांगली वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात वन्यजीवांबरोबरच पक्ष्यांच्या संख्येतही चांगली वाढ होऊ लागली आहे. (वार्ताहर)
वन विभागाला ५५ मगरी आढळल्या
सांगली आणि शिराळा वन परिक्षेत्रामध्ये नदी किनाऱ्यावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वन विभागाला ५५ मगरी आढळून आल्याचीही माहिती मिळून आली. त्याठिकाणी वन विभागाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या प्राण्यांकडून मानवावर हल्ले होऊ नयेत म्हणून हे प्राणी आढळल्यास त्यांना सुरक्षित ठिकाण असलेल्या त्यांच्या अधिवास क्षेत्रात ठेवण्याचे कामही वन विभागाकडून केले जात आहे.
काटेकोर अंमलबजावणी
वन अधिनियम १९७२ च्या काटेकोर अंमलबजावणीमुळे वन्यप्राण्यांना संरक्षण मिळाले आहे. वन्यप्राण्यांचा वावर आढळून आल्यावर या वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासात सुरक्षित ठिकाणी सोडले जात आहे. तसेच वन्यप्राण्यांकडून मानवाची हत्या झाल्यास त्वरित आठ लाखांची मदत दिली जाऊ लागली आहे. अपंगत्व आल्यास चार लाखांची मदत मिळते. पिकांचे नुकसान झाल्यासही त्वरित मदत दिली जाऊ लागली आहे. त्यामुळेही प्राण्यांच्या हत्या कमी होऊ लागल्या आहेत. वन विभागाच्या क्षेत्रात तृणभक्षी प्राणी वाढले आहेत, अशी माहिती जिल्हा विभागीय वन अधिकारी समाधान चव्हाण यांनी दिली.
वन्य पशू
ुदिन विशेष..