गुऱ्हाळघरांना मिळणार दिवसा वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:02 AM2020-12-05T05:02:50+5:302020-12-05T05:02:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क (सडोली खालसा) गुऱ्हाळघरांना रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी गुऱ्हाळघरांना ‘महावितरण’कडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
(सडोली खालसा)
गुऱ्हाळघरांना रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी गुऱ्हाळघरांना ‘महावितरण’कडून दिवसा वीजपुरवठा करावा, यासाठी करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांनी सप्टेंबरमध्ये मागणी करून पाठपुरावा केला होता. या त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आज, शनिवारपासून गुऱ्हाळघरांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे गुऱ्हाळघरांना व शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा दिला जातो. त्यानुसार करवीरचे आमदार पी .एन. पाटील यांनी सप्टेंबर महिन्यामध्येच पत्रव्यवहार करून याचा पाठपुरावा केला होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच मुंबई येथील कार्यालयाने कोरोनाकाळातील थकबाकी जादा दिसल्यामुळे थकबाकी भरूनच दिवसा वीजपुरवठा सुरू करावा, अशा पद्धतीने अट घालून कोल्हापूर विभागाला मंजुरीचे पत्र दिले होते. त्यामुळे स्थानिक वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिवसा लाईट सुरू करणे अडचणीचे झाले होते. त्यामुळे पुन्हा आमदार पी. एन. पाटील यांनी मुंबईतील कार्यालयाशी स्वतः फोनवर संपर्क साधून तसेच पुन्हा पत्रव्यवहार करून टप्प्याटप्प्याने आमचे शेतकरी वीज बिले भरतील, अशा पद्धतीची स्वत: हमी देऊन सदरचे पत्र बदलून पुन्हा मुंबईच्या कार्यालयाकडून नवीन पत्र कोल्हापूर विभागात पाठविण्यास भाग पाडले. या पाठपुराव्यामुळे आजपासून गुऱ्हाळघरांना दिवसा सकाळी ९ ते ५ या वेळेत वीजपुरवठा सुरू होणार आहे.
चालूवर्षी मुंबई येथील अधिकाऱ्यांनी घातलेल्या थकबाकी वसुलीच्या काही अटींच्यामुळे थोडा विलंब लागला परंतु आमदारांनी काळजीपूर्वक यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना हप्ते देण्याचा तोडगा काढून सदरचा पाठपुरावा करून फक्त शेतकऱ्यांसाठी ही मंजुरी तत्काळ घेऊन दिल्याने गुऱ्हाळमालकांच्यात समाधान व्यक्त होत आहे.