कोल्हापुरात बंगाली कॅटपासून दुर्मीळ सियामीन मांजरांचा कॅटवॉक, मांजरप्रेमींनी केली गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 03:32 PM2024-12-02T15:32:43+5:302024-12-02T15:32:43+5:30
कोल्हापूर : बंगाली टायगरसारखा दिसणाऱ्या बंगाली कॅटपासून पर्शियन तसेच विविध जातींच्या मांजरांना पाहायला कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे भरलेल्या ...
कोल्हापूर : बंगाली टायगरसारखा दिसणाऱ्या बंगाली कॅटपासून पर्शियन तसेच विविध जातींच्या मांजरांना पाहायला कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे भरलेल्या प्रदर्शनात मांजारप्रेमींनी रविवारी गर्दी केली. या प्रदर्शनात गुजरात, कर्नाटकातील विविध जातींच्या दीडशेहून अधिक रंगीबेरंगी मांजरी सहभागी झाल्या होत्या. १५ वर्षांखालील सुमारे ३५ हजार मुलांबरोबर ज्येष्ठांनीही या प्रदर्शनाचा मोफत लाभ घेतला.
फिलाईन क्लब ऑफ इंडियातर्फे भरवण्यात आलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, तसेच अहमदाबाद, बेळगाव, बंगळुरू आणि हुबळी येथून आलेल्या मांजरप्रेमींनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. कोल्हापूर येथे झालेल्या या कॅट शोमध्ये हुबेहूब बंगाली टायगरसारख्या दिसणाऱ्या बंगाली कॅटचे २५, बंगाली मेनकूनचे २५, पॅर्शियन मांजर, क्लासिक लाँग हेअर आणि शॉर्ट हेअर, एक्झाटिक हेअर अशा विविध जातींची लाखाे रुपये किमतीच्या मांजरी सहभागी झाल्या होत्या. दुर्मीळ मानलेल्या सायबरेयन आणि सियामीन कॅटचाही या प्रदर्शनात समावेश होता. इंडोनेशियाचे फॅडलीड फॉड, इंद्र लुबिस आणि साकिब पठाण हे परीक्षक होते.
गावठी मनीमाऊलाही सन्मान
या प्रदर्शनात गावठी म्हणून हिणवलेल्या भारतीय मांजरांनाही सहभागी करून घेतले होते. इंडी माऊ म्हणून त्यांना यापुढे संबोधित करण्यात येत असल्याची माहिती आयोजक दिगंबर खोत यांनी दिली.