समाजाची जडण-घडण ज्येष्ठांमुळे
By admin | Published: October 2, 2015 01:07 AM2015-10-02T01:07:02+5:302015-10-02T01:07:02+5:30
चंद्रकुमार नलगे : अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्टच्यावतीने ‘ज्येष्ठ नागरिक दिना’निमित्त सत्कार
कोल्हापूर : वय वाढले म्हणजे ज्येष्ठ नागरिकाचे लक्षण नव्हे, तर जीवनात सर्वांनी कर्तृत्वाने यशाचे शिखर गाठणे आवश्यक आहे. समाजाने आज ज्येष्ठांचा आदर, सन्मान राखणे गरजेचे आहे, असे अनेक अनुभव मान्यवरांसह ज्येष्ठ नागरिकांनी कथन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसोबत आलेले कुटुंबीय त्यांच्या सत्काराने भारावून गेले, तर अनेक ज्येष्ठांनी मातेचे चरणस्पर्श करीत आशीर्वाद घेतला.निमित्त होतं, इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. अनंतराव गोविंदराव कोरगावकर सामाजिक सेवा संघ (ट्रस्ट) आणि कोरगावकर पेट्रोल पंप, शिरोली (पु.) यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या ‘ज्येष्ठ नागरिक दिना’चे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या हस्ते २० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ‘एचपीसीएल’चे कोल्हापूर जिल्ह्याचे विभागीय विक्री व्यवस्थापक शुभब्रता खान, मातोश्री वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा प्रभावती चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती. ट्रस्टचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे हा सत्कार समारंभ झाला.
चंद्रकुमार नलगे म्हणाले, समाजाची सांस्कृतिक जडण-घडण ही ज्येष्ठ नागरिकांमुळे होते. त्यांच्या अनुभवावर समाजात अशा प्रकारे विविध उपक्रम होत आहे. कोरगावकर ट्रस्टने ज्येष्ठ नागरिकांचा केलेला सत्कार ज्येष्ठांना ऊर्मी देणारा आहे. विवेक आगवणे म्हणाले, आज ज्येष्ठ नागरिकांबद्दल माणुसकी संपत चालली दिसत आहे. ज्येष्ठांसाठी शासनाने कायदे केले; पण ते चुकीच्या पद्धतीने राबविले जात आहेत. समाजात ज्येष्ठ नागरिकांची भूमिका आज महत्त्वपूर्ण ठरत आहे. म्हणून त्यांनी समाजासाठी सतत क्रियाशील राहणे आवश्यक आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विलास झुंझार, शशी गजवानी, रजनीकांत शहा, मदनलाल मुथा, विभावरी सुमनलाल शहा, राजाराम नारायण रक्तवाण, स्वाती गोखले, हसन देसाई, सुमित्रा जाधव, श्रीपाल जर्दे, बापूसाहेब भोसले, सुलोचना एम. श्रीधर, शिवाजी एम. श्रीधर, शिवाजीराव हिलगे, प्रभाकर कांबळे, बाबासाहेब धोंडीराम पाटील, राजाराम यादव, दत्तात्रय साळुंखे, नारायण कांझर, पांडुरंग पाटील, अजित पाटील, दीपक लोले, किल्ले गडकोट गिर्यारोहक प्रकाश यल्लापा कदम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.
यावेळी शुभब्रता खान, प्रभावती चिटणीस, सत्कारमूर्ती शशी गजवानी, राजाराम रक्तवाण, प्रकाश कदम यांनी मनोगत व्यक्त केले. ट्रस्टचे अध्यक्ष अमोल कोरगांवकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राज कोरगावकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)