सावधान : फसवणुकीचा नवा फंडा; ३६ महिन्यांत दामदुप्पट..काय आहे नेमकी स्कीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 01:09 PM2021-11-16T13:09:01+5:302021-11-16T13:30:23+5:30
तुम्ही फक्त एक लाख रुपये भरले की ४५ दिवसांनंतर तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये व्याज मिळणार आणि ३६ महिने झाल्यावर मूळ मुद्दल एक लाख रुपये परत मिळणार अशी ३६ महिन्यांत रक्कम दामदुप्पट योजनेने कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत धुमाकूळ घातला आहे.
विश्वास पाटील -
कोल्हापूर : तुम्ही फक्त एक लाख रुपये भरले की ४५ दिवसांनंतर तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये व्याज मिळणार आणि ३६ महिने झाल्यावर मूळ मुद्दल एक लाख रुपये परत मिळणार अशी ३६ महिन्यांत रक्कम दामदुप्पट योजनेने कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत धुमाकूळ घातला आहे. या तिन्ही जिल्ह्यांत मिळून किमान एक हजार कोटींहून जास्त रक्कम या योजनेत गुंतवणूक झाल्याची माहिती आहे. ही गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये असल्याचे सांगण्यात येत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही.
कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लजमधील मुख्यत: शिक्षक, करवीर तालुक्यातील सांगरूळपासून बीडशेडपर्यंतची गावे, पन्हाळा तालुका व शेजारच्या सांगली व सातारा जिल्ह्यांत कामधंदा सोडून लोक याच गुंतवणुकीसाठी जिवाचा आटापिटा करू लागले आहेत. एखाद्या छोट्या गावांतूनही दीड-दीड कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक या योजनेत झाली आहे. मुख्यत: शिक्षक, व्यावसायिक, चांगली आर्थिक क्षमता असलेले शेतकरी यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू लागले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात किमान चार कंपन्यांच्या माध्यमातून हा व्यवहार सुरू आहे. आज या गावात त्याला गाडी मिळाली, उद्या त्या गावात मिळाली अशी हवा सगळीकडे होत असल्याने लोक मोठ्या प्रमाणावर कर्जे काढूनही त्यामध्ये गुंतवणूक करू लागले आहेत.
आतापर्यंतचा अनुभव..
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत संचयनी, पिअरलेस, कल्पवृक्ष, पॅनक्लब यासारख्या अनेक कंपन्यांमध्ये लोकांनी शेकडो कोटींची गुंतवणूक केली व ती सर्व बुडली आहे. मेकर ग्रुपमध्येही कोल्हापूर जिल्ह्यातील ५० कोटींची व पश्चिम महाराष्ट्रात ५० कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्याविरुद्ध उच्च न्यायालयात तीन वर्षे दावा सुरू आहे. परंतु, मूळ संशयित आरोपीच अजून सापडत नाही. असे अनुभव पाठीशी असतानाही लोक आमिषाला भुलून गुंतवणूक करत आहेत.
एखादी व्यक्ती शेअर ब्रोकिंगचा परवाना घेऊन व्यक्तिगत शेअर मार्केटिंग करू शकतो. परंतु, या व्यवहारात परवाना व्यक्तिगत, लोकांकडून पैसे घेऊन ते स्वत:च्या नावांवर ट्रेडिंग केले आहे. म्युच्युयल फंडात लोकांकडून पैसे घेऊन गुंतवणूक करण्यास सेबी मुभा देते, परंतु ही गुंतवणूकदाराने स्वत:च्या जोखमीवर करावी, असे अपेक्षित असते.
योजना नक्की काय आहे..
- एक लाख रुपये भरले की, ४५ दिवसांनी दरमहा ३ हजार रुपये व्याज सुरू.
- दरमहा व्याज ३६ महिने मिळणार
- मूळ मुद्दल १ लाख रुपये पुन्हा ३६ महिन्यांनंतर परत.
- कंपनीसाठी ब्रोकर म्हणून मी १५ लाख गुंतवणूक मिळवून दिल्यास ६ लाखांपर्यंतची गाडी लगेच मिळणार. गाडी आपल्या नावावर घ्यायची, परंतु त्याचे व्याज व कर्जाचे हप्ते संबंधित कंपनी देणार.
वस्तुस्थिती काय सांगते..
जगात आज अशी एकही बँक किंवा वित्तीय संस्था नाही, की ती ३६ महिन्यांत दामदुप्पट रक्कम देऊ शकेल. आम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला त्याचा फायदा मिळवून देतो, असे सांगण्यात येते. परंतु, शेअर मार्केटमध्ये मागच्या ४० वर्षांत कधीच जास्तीत जास्त १६.५० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळालेला नाही. तो परतावाही किमान ५ ते १० वर्षे गुंतवणूक केल्यावरच मिळू शकतो, असे आर्थिक गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
मग पैसे परत कसे दिले जातात..?
तज्ज्ञांच्या मते हा सरळ सरळ मल्टिलेव्हल मार्केंटिंगचा फंडा आहे. ज्यामध्ये पुढच्याकडून आलेले पैसे मागच्याला दिले जातात. जास्त परतावा मिळतो म्हणून लोक मोठ्या संख्येने त्यामध्ये गुंतवणूक करू लागले आहेत. जेव्हा नव्याने गुंतवणूक करणारे लोक थांबतील, तेव्हा हा सगळा फुगा फुटेल. परंतु, सध्या लोकांना पैसे मिळतात म्हणून त्यात गुंतवणूक होत आहे.
गडहिंग्लजचा अनुभव ताजा..
गडहिंग्लजमधील एका सहकारी बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने बँकेतील पैसे असेच शेअर मार्केटमध्ये गुंतवून तब्बल १३ कोटी रुपयांस गंडा घातला आहे. तरीही गडहिंग्लजचे लोक अजूनही त्यातून काही शहाणपण घ्यायला तयार नाहीत.
गाडीचे गोडबंगाल..
१५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास कंपनीकडून तुम्हाला सहा लाखांची गाडी दिली जाते. गाडी तुमच्या नावावर असते. कंपनी फक्त व्याज व हप्ते देते. याचा अर्थच असा आहे की जेव्हा केव्हा या गुंतवणुकीचा फुगा फुटेल तेव्हा कंपनी नामानिराळी राहील व कर्ज देणारी बँक गाडी ओढून नेईल.
सेबीच्या नियमानुसार कोणीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून फिक्स्ड रिटर्नची हमी देऊ शकत नाही. या नियमाला पळवाट म्हणून सेबीकडून शेअर ब्रोकरचा परवाना घेऊन दिशाभूल करून विविध नावीन्यपूर्ण नावानी पैसे घेतले जातात. योग्य कायदेशीर माहिती न घेता गुंतवणूक केल्यास मोठी फसवणूक होऊ शकते. - दीपक गुंदेशा, सीए कोल्हापूर.