सावधान; हनीट्रॅपच्या प्रकारात होतीय वाढ, कोल्हापुरात अल्पवयीन मुलीने व्यापाऱ्याला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 04:12 PM2021-11-21T16:12:45+5:302021-11-21T18:26:53+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरच्या साखर व्यापाऱ्यास हनी ट्रॅपमध्ये अडकून त्यांच्याकडून सव्वातीन कोटींची खंडणी उकळल्याचा प्रकार ताजा असतानाच आज आणखीन एक ...
कोल्हापूर : कोल्हापूरच्या साखर व्यापाऱ्यास हनी ट्रॅपमध्ये अडकून त्यांच्याकडून सव्वातीन कोटींची खंडणी उकळल्याचा प्रकार ताजा असतानाच आज आणखीन एक अशीच घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने कोल्हापुरातील तरुण कापड व्यापाऱ्याला अडकवून सुमारे अडीच लाखाला गंडा घातला आहे. आज, रविवारी (दि.२१) हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सागर पांडुरंग माने (वय-३२ रा. कळंबा. ता. करवीर), सोहेल ऊर्फ अरबाज मुनाफ वाटंगी (२३, रा. जुना वाशी नाका), उमेश श्रीमंत साळुंखे (२३, रा. राजारामपुरी), आकाश मारुती माळी (३०, रा. यादवनगर), लुकमान शकील सोलापूरे (२७, जवाहरनगर) आणि सौरभ गणेश चांदणे (२३, यादवनगर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या सहा संशयितांची नावे आहेत.
या युवतीने संबंधित व्यापाऱ्यास त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरुन संबंधित व्यापाऱ्याने दोन दिवसांपूर्वी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र नातेवाईक आणि पोलिसांच्या सर्तकेतेमुळे तरूणाचा जीव वाचला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी शहरातील मध्यवर्ती परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन युवतीसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी राजवाडा पोलिस ठाण्यात अल्पवयीन तरुणीसह साखळीतील संशयित विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
हनीट्रॅपचा हा प्रकार उघडकीस येताच शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. फिर्यादी असलेल्या तरुणाची अल्पवयीन युवतीबरोबर काही काळापूर्वी ओळख झाली. यातूनच हा प्रकार घडला.