सीबीआय करणार समीरची चौकशी
By Admin | Published: March 24, 2016 11:34 PM2016-03-24T23:34:05+5:302016-03-25T00:02:12+5:30
न्यायालयाची परवानगी : जामीन पुन्हा नाकारला
कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासकामी चौकशी करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा जबाब नोंदविणार आहे. बुधवारी (दि. २३) अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी ‘सीबीआय’च्या यासंबंधीच्या विनंती अर्जाला परवानगी दिली. त्यामुळे सीबीआयचे अधिकारी कळंबा मध्यवर्ती कारागृहात समीर गायकवाडची चौकशी करून त्याचा लवकरच जबाब घेण्याची शक्यता आहे. समीर गायकवाडचा जामीन अर्ज न्यायालयाने बुधवारी दुसऱ्यांदा फेटाळला. दरम्यान, दि. २९ मार्च रोजी पानसरे हत्येच्या सुनावणीवेळी समीर गायकवाड हा न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे.
गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित व सनातन संस्थेचा साधक असलेला समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर कोल्हापुरातील न्यायसंकुलामध्ये बिले यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी अॅड. समीर पटवर्धन यांनी समीर गायकवाडचा जामीन अर्ज मंजूर करावा, (पान १ वरून) अशी केलेली विनंती न्यायालयाने फेटाळली. यावेळी नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपासकामी समीर गायकवाडची चौकशी करण्याची परवानगी मिळावी अशी विनंती करणारा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीबीआय) अर्ज जिल्हा सरकारी वकील दिलीप मंगसुळे यांनी न्यायालयात सादर केला. न्यायालयाने तो मंजूर केला आणि कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला तशा सूचना केल्या जातील, असे स्पष्ट केले. यावेळी अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, सीबीआयचे अतिरिक्त उपायुक्त सतीश देवरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांच्यासह अॅड. विवेक घाटगे, अॅड. प्रकाश मोरे, मेघा पानसरे, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, आदी उपस्थित होते.
एस. आर. सिंग करणार चौकशी
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक एम. एम. कलबुर्गी या तिघांच्याही हत्यांमध्ये साधर्म्य असल्याने
तसेच तपासाचा भाग म्हणून सीबीआय समीर गायकवाडची चौकशी करणार आहे.
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणारे सीबीआयचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. आर. सिंग यांच्यासह अन्य अधिकारी कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात लवकरच जाऊन समीरची चौकशी करून जबाब घेतील.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणारे अधिकारी दैनंदिन तपासाची माहिती उच्च न्यायालयाला देत आहेत. त्यामुळे पानसरे हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे न्यायालयाचे मत आहे.
-अॅड. हर्षद निंबाळकर, विशेष सरकारी वकील
जिल्हा न्यायालयाने समीरचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहोत. समीरचा जबाब घेताना सीबीआयने सक्षम अधिकारी समवेत घ्यावे, अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे. तसेच २९ मार्चला सुनावणीवेळी समीर हजर राहण्याची शक्यता आहे.
- अॅड. समीर पटवर्धन, समीर गायकवाडचे वकील
दाभोलकर यांच्या हत्येवर प्रकाशझोत
पुणे येथे २० आॅगस्ट २०१३ रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा तपास ९ मे २०१४ रोजी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्यात आला. त्यानुसार सीबीआय दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करीत आहेत.