विनाकारण फिरणाऱ्यावर सीसी कॅमेराद्वारे नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 07:06 PM2021-04-10T19:06:21+5:302021-04-10T19:08:25+5:30
corona virus Police Kolhapur- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या वीकेंड लॉकडाऊनला कोल्हापुरात चांगला प्रतिसाद लाभला. शहरातील रस्ते निर्मनुष्य राहिले. संपूर्ण शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहिला. शहरातील प्रमुख चौकातील परिस्थितीवर पोलिसांनी मुख्यालयातील सीसी टीव्ही कॅमेराद्वारे वॉच ठेवला. रस्त्यावर नागरिक एकत्रित दिसताच मुख्यालयातून वायरलेसवरून सूचना देऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवले.
कोल्हापूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या वीकेंड लॉकडाऊनला कोल्हापुरात चांगला प्रतिसाद लाभला. शहरातील रस्ते निर्मनुष्य राहिले. संपूर्ण शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहिला. शहरातील प्रमुख चौकातील परिस्थितीवर पोलिसांनी मुख्यालयातील सीसी टीव्ही कॅमेराद्वारे वॉच ठेवला. रस्त्यावर नागरिक एकत्रित दिसताच मुख्यालयातून वायरलेसवरून सूचना देऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवले.
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी ब्रेक द चेनसाठी प्रशासनाने शनिवारी व रविवारी वीकेड लॉकडाऊन केले. शहराच्या चौका-चौकात पोलीस, होमगार्ड तसेच वाहतूक पोलिसांनी खडा पहारा दिला. शहरात प्रवेशणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांची विचारपूस करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जात होता. विनाकारण फिरणाऱ्याच्या दुचाकी जप्त केल्या. त्यामुळे रस्ते, चौक सुनसान होते. फक्त अत्यावश्यक कारणांसाठी काहीजण वाहनावरून फिरताना दिसत होते. तेही पोलिसांचा नजरेतून सुटत नव्हते.
दिवसभर तावडे हॉटेल, ताराराणी चौक, दसरा चौक, शिवाजी पूल, कळंबा नाका, सायबर चौक, कसबा बावडा, शिये नाका, साने गुरुजी वसाहत, आर.के.नगर या प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात होती. पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव, राजारामपुरीचे पो.नि. सीताराम डुबल, शाहुपुरीचे पो.नि. श्रीकृष्ण कटकधोंड, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी तसेच काही पोलिसांनी संपूर्ण शहरातून वाहनांचे संचालन केले. यावेळी कोपऱ्यावर नाहक उभारलेल्या नागरिरकांना ध्वनिक्षेपावरून कारवाईच्या सूचना केल्या.