अंबाबाई मंदिरातील सीसीटीव्हींना ‘मोतीबिंदू’
By admin | Published: May 24, 2017 12:40 AM2017-05-24T00:40:43+5:302017-05-24T00:40:43+5:30
कॅमेरे झाले कालबाह्य : अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेचा अभाव; २७ कॅमेऱ्यांची स्थिती ‘असून अडचण नसून खोळंबा’
इंदुमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : देशातील अतिसंवेदनशील मंदिरांमध्ये समावेश असलेल्या व अतिरेक्यांच्या ‘हिटलिस्टवर’ असलेल्या अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेची मदार अत्यंत जुन्या पद्धतीच्या कालबाह्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर आहे. एकीकडे सुरक्षेचा बाऊ केला जात असताना दुसरीकडे माणूस शेजारून गेला तरी त्याचे सुस्पष्ट चित्र न दाखवणारे मंदिर परिसरातील २७ सीसीटीव्ही कॅमेरे असून नसल्यासारखे आहेत. डोळ््यांत मोतीबिंदू पिकल्यानंतर जसे दिसते तशी या कॅमेऱ्यांची स्थिती बनली आहे.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी महत्त्वाचे पीठ असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराला दरवर्षी ४० लाखांहून अधिक भाविक भेट देतात. नवरात्रौत्सवात तर मंदिरात उच्चांकी गर्दी असते. ‘एसआयटी’ने हे मंदिर अतिरेक्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असल्याचा अहवाल दिल्यानंतर गेल्या सात-आठ वर्षांत मंदिराच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना आखण्यात आल्या. दोन दरवाजे बंद करण्याचाही प्रयोग करण्यात आला. मात्र, या सगळ््या उपाययोजना केवळ ‘आरंभशूर’ ठरल्या. मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सन २००५ मध्ये पहिल्यांदा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यानंतर कॅमेरे खराब होतील तसे बदलण्यात आले. मुख्य मंदिराचा अंतर्गत परिसर, बाह्य परिसरात मिळून जवळपास ३५ सीसीटीव्ही कॅमेरे सध्या कार्यरत आहेत. त्यापैकी गतवर्षी नवरात्रौत्सवात एचडी टेक्नॉलॉजीचे आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. ते वगळता अन्य २७ कॅमेरे आता कालबाह्य झाल्याने त्यांची स्थिती ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे.
या २७ कॅमेरांची समोरच्या घटनांचे चित्रीकरण ग्रहण करण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. या कॅमेराला भाविक अगदी घासून निघून गेला तरी त्याचा चेहरा सुस्पष्ट दिसत नाही तिथे चोरीसह अन्य कारवाया टिपण्याचा प्रश्नच येत नाही. आता एचडी टेक्नॉलॉजीपेक्षाही अॅडव्हान्स असे आयपी सिस्टीमचे सीसीटीव्ही कॅमेरे बाजारात आले आहेत. हेच कॅमेरे कोल्हापुरातील महत्त्वाच्या प्रमुख चौकांमध्ये लावण्यात आले आहेत. एवढे अत्याधुनिक कॅमेरे बाजारात आले असताना देवस्थान समितीने मात्र अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेची मदार अंधुक, अस्पष्ट अशा जुन्या-पुराण्या सीसीटीव्ही कॅमऱ्यांंवर ठेवली आहे.
कंट्रोल रूम पाच फुटांचा...
अंबाबाई मंदिराच्या ओवरीतच देवस्थान समितीचे कार्यालय आहे. या कार्यालयातील मोजून पाच फुटांची जागा म्हणजे कंट्रोल रूम. ही रूमदेखील या जुन्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायरी आणि माईक, साऊंड सिस्टीम अशा यंत्रणांनी भरली आहे. या कंट्रोल रूमची जबाबदारी असलेल्या माणसाला दिवसभर अगदी स्क्रीनच्या पुढ्यात बसावे लागते. त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर ताण येतो.
राजवाडा पोलीस ठाण्यातील प्रक्षेपण बंद
देवस्थान समितीने अंबाबाई मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरांच्या प्रक्षेपणाची एक लिंक जुना राजवाडा पोलीस ठाण्याला देखील दिली आहे. पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयातील टीव्हीवर हे प्रक्षेपण दिवस-रात्र सुरू असते. मात्र, ते देखील गेल्या कित्येक दिवसांपासून बंद आहे. याबाबत विचारणा केली असता पोलीस ठाण्यातून येथे सध्या टीव्ही नसल्याचे कारण सांगण्यात आले.
मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे जुने झाले आहेत. त्यातून सुस्पष्ट चित्रीकरण होत नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत ते बदलण्याचा विचार सुरू आहे. कंट्रोल रूमबद्दल अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यांतर्गत विचार करता येईल.
- विजय पोवार
(सचिव देवस्थान समिती)