गांधीनगरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज

By admin | Published: March 3, 2016 12:28 AM2016-03-03T00:28:59+5:302016-03-03T00:29:10+5:30

गुन्हेगारी प्रमाणात वाढ : चोऱ्या, किरकोळ गुन्ह्यांवर पाळत ठेवण्यासाठी महत्त्वाचा घटक

CCTV cameras needed in Gandhinagar | गांधीनगरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज

गांधीनगरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज

Next

बाबासाहेब नेर्ले --गांधीनगर -व्यापाऱ्याचे अपहरण, चोरी, भुरट्या चोरी, मटका आणि अवैध धंद्यांमुळे गांधीनगर बाजारपेठेत वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे. गुन्हेगारीविषयक घटनांना आळा घालण्यासाठी गांधीनगर बाजारपेठेत सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची गरज निर्माण झाली आहे. व्यापारी पेठेत किरकोळ आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत वाढ होऊ लागल्याने कापड नगरीतील गुन्हेगारांवर पाळत ठेवण्याची गरज भासू लागली आहे. त्यासाठी सीसीटीव्ही चांगला पर्याय ठरणार असून, लोकसहभागातून हा उपक्रम राबवण्यासाठी व्यापारी व अन्य व्यावसायिकांनी पुढे येणे अपेक्षित आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील मोठी कापड बाजारपेठ म्हणून गांधीनगरची ओळख आहे. उचगाव, गडमुडशिंगी, गांधीनगर, वळिवडे व चिंचवाड या पाच गावच्या हद्दीत ही व्यापारीपेठ विस्तारली आहे. या व्यापारी केंद्रात कापड व्यवसायाबरोबरच प्लास्टिक, कटलरी, होजिअरी अनेक छोटेमोठे उद्योग विस्तारत आहेत. जिद्दीने, कष्टाने येथील व्यापारी व्यवसाय करीत आहेत; पण ‘आयत्या बिळात नागोबा’ या म्हणीप्रमाणेच काहीजण व्यापाऱ्यांना त्रास देतात. चोऱ्या, अपहरण, चेनस्नॅचिंग या घटनांना येथील व्यापाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. अपहरण, चोऱ्यासारख्या घटना घडूनही काही व्यापारी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे पोलिसांनाही अशा गुन्ह्यांचा शोध घेण्यात अडचणी निर्माण होतात. परिणामी अशा गुन्हेगारांचे फावते आहे.
दोन वर्षांत तीन अपहरणाच्या घटना घडल्या. त्यामध्ये मोठ्या व्यावसायिकांनाच टार्गेट करण्यात आले. त्यामुळे गांधीनगर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. घटना ताजी होती तेव्हा अनेक व्यापारी व व्यावसायिकांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही बसविण्यासाठी पुढाकार घेतला; पण त्याला म्हणावी तितकी गती मिळाली नाही. होलसेल संघ, रिटेल व्यापारी संघ तसेच अन्य संघटना यांच्या मदतीने व सीसीटीव्हीच्या आधारे असे वाढते गुन्हे रोखता येतील; पण त्याची गंभीरता लक्षात येणे गरजेचे आहे.
एक महिन्यापूर्वी गांधीनगरातील एका व्यापाऱ्याचे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना अपहरण झाले. त्यामुळे गांधीनगर व्यापारीपेठेत भीतीचे वातावरण पसरले. अनेक व्यापारी हे मॉर्निंग वॉकला जाण्याचे टाळू लागले. गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना कमी करावयाच्या असल्यास अशा घटनांवर चाप आणला पाहिजे. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज आहे.
सीसीटीव्ही बसविल्याने अनेक गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवणे सहज शक्य होईल. गर्दीच्या ठिकाणी होणारी पाकीटमारी, किरकोळ वाद, महिलांची होणारी टिंगलटवाळी, चोरीच्या घटना, या सर्व बाबींवर अंकुश ठेवणे सहज शक्य होईल. तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे गेट हा मुख्य रस्ता तसेच शेरू चौक, सिंधू मार्केट, रेल्वे स्थानक, भाजी मंडई, गुरुनानक पेट्रोल पंप, अशा वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्हीची गरज आहे.
यासाठी येथील व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन या सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. व्यापारी पेठेवर सीसीटीव्हीचा वॉच राहिला तर अशा दुर्घटनांपासून गांधीनगर बाजारपेठ सुरक्षित राहील. गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात मदत होईल. +


परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पोलीस प्रशासन कुठेही कमी पडणार नाही. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेतच; पण ती कशी टाळता येईल या बाबींकडे लक्ष केंद्रित करून उपाय योजना करण्याची सर्वांची जबाबदारी आहे.
- संभाजी गायकवाड
सहायक पोलीस निरीक्षक
गांधीनगर पोलीस ठाणे.


वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी गांधीनगरमध्ये सीसीटीव्हीची गरज आहेच. त्या बाबतीत सर्व होलसेल व रिटेल व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला तर गांधीनगर खरोखरच भयमुक्त होईल.
- सुरेश आहुजा
व्यापारी गांधीनगर

वाहतुकीच्या दृष्टीने गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांमध्ये गुन्हेगारींची दहशत आहे. त्यामुळे बिनधास्त फिरणे अवघड झाले आहे.
- रमेश वाच्छाणी
व्यापारी, गांधीनगर.

Web Title: CCTV cameras needed in Gandhinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.