‘सी.सी.टी.व्ही. कॅमेरे’ योजना बासनात!
By admin | Published: November 2, 2014 11:35 PM2014-11-02T23:35:39+5:302014-11-02T23:52:44+5:30
प्रवाशांची नाराजी : कोकण रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार थांबणार कधी?
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, चिपळूणसह महत्त्वाच्या सर्वच स्थानकांवर व आरक्षण कक्षाजवळ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याची योजना जाहीर होऊनही त्याबाबतची अंमलबजावणी थांबल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोकण रेल्वेने तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना आखली होती. मात्र, आता त्याबाबत कोकण रेल्वेच गंभीर नसल्याचे दिसून येते.
कोकण रेल्वेचे आरक्षण तीन महिने अगोदर सुरू होते. मात्र, आरक्षणाची खिडकी उघडल्यानंतर काही वेळातच सर्व आरक्षण फुल्ल होते. यावरून तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची प्रवाशांची ओरड आहे. त्यावर तोडगा म्हणून महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर आरक्षण खिडकीजवळ हे सीसीटीव्ही बसवावेत, अशी प्रवाशांची मागणी होती. गेल्या दोन वर्षांच्या काळात कोकण रेल्वेची तिकिटे ऐन हंगामात एकदम आरक्षित होणे, तिकिटांचा काळाबाजार होणे, असे प्रकार सातत्याने होत आहेत. त्यासाठीच मार्गावरील खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी यासारख्या महत्त्वाच्या स्थानकांमध्ये आरक्षण खिडकीजवळील रांगेवर लक्ष ठेवण्यासाठी व तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्याची मागणी होत होती. त्यानुसार कार्यवाही करण्याचे संकेतही कोकण रेल्वेने दिले होते. मात्र, या योजनेची कार्यवाही अद्यापही झालेली नाही. त्यामुळे गणेशोत्सवाबरोबरच दिवाळीतही कोकणात येणाऱ्या मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर हाल सोसावे लागले. खचाखच भरलेल्या रेल्वेतून प्रवास करण्याची वेळ आली. कोकण रेल्वेची तिकिटे आरक्षित होणे, यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल केला जात आहे. विशेष म्हणजे कोकण रेल्वेने याबाबतची घोषणा केली; मात्र त्याबाबतची कार्यवाही मंदगतीने होत असल्याने ‘सीसीटीव्ही’ ही घोषणाच ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
कारवाई होणे आवश्यक
कोकण रेल्वेमार्गावरील सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविले जावेत, तसेच त्यावरील चित्रण प्रामाणिकपणे व नियमित पाहिले जावे. त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी, तसेच चित्रणात तिकिटांचा काळाबाजार करणारा संशयित सापडल्यावर कारवाईही होणे गरजेचे आहे.
- राजू भाटलेकर,
कोकण रेल्वे प्रवासी संघटना