महिला सुरक्षेसाठी कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवात सीसीटीव्हीचा वॉच; मिरवणूक, साऊंड सिस्टीमबाबत काय निर्णय.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:15 PM2024-08-30T12:15:44+5:302024-08-30T12:16:38+5:30

७५ डेसिबलच्या पुढे आवाज गेल्यास गुन्हे दाखल

CCTV watch at Ganeshotsav in Kolhapur for women's safety; Police gave instructions to the circles regarding the procession, sound system | महिला सुरक्षेसाठी कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवात सीसीटीव्हीचा वॉच; मिरवणूक, साऊंड सिस्टीमबाबत काय निर्णय.. वाचा

महिला सुरक्षेसाठी कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवात सीसीटीव्हीचा वॉच; मिरवणूक, साऊंड सिस्टीमबाबत काय निर्णय.. वाचा

कोल्हापूर : महिला-मुलींवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवातमहिला सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल. सर्व मंडळांनी किमान २ सीसीटीव्ही कॅमेरे उत्सवमूर्ती परिसरात बसवावेत. हे सीसीटीव्ही फुटेज सेव्ह करून ठेवावे, अशी सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुरुवारी मंडळांना केली. कायदा व न्यायालयीन निर्णयानुसार ध्वनी मर्यादा ७५ डेसिबलच्या पुढे गेल्यास मंडळावर गुन्हा दाखल केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उत्सव काळात बीभत्स गाणी, अश्लील नृत्य यासारखे प्रकार करू नयेत, उत्सव आनंदात व शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांनी आचारसंहिता घालून घ्यावी, अशा सूचना केल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, शहर पाेलीस उपअधीक्षक अजय टिके उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक पंडित म्हणाले, गेल्यावर्षी ७ हजार ९०८ गणेशोत्सव मंडळे होती. यंदा ही संख्या साडेआठ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. यापैकी फक्त ३० मंडळांकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. गणेशोत्सवावर लाखो रुपये खर्च करताना महिला व सार्वजनिक सुरक्षेसाठी प्रत्येक मंडळाने किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. मंडळांच्या तुलनेत पोलिसांची संख्या फक्त ३ हजार आहे. याचा विचार करून पाेलीस व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा.

जिल्हाधिकारी अमाेल येडगे म्हणाले, गणेशोत्सव हा आनंदाचा सण आहे. तो पर्यावरणपूरक साजरा व्हावा. महिला, बालके, वृद्धांसह कुणालाही त्रास होणार नाही, बीभत्स नृत्य होणार नाही यासाठी प्रत्येक मंडळाने स्वत:ची नियमावली व आचारसंहिता ठरवावी. यंदा शाहू महाराजांचे शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष असल्याने शाहू महाराजांचे विचार उत्सवातून व प्रबोधनातून मांडा.
यावेळी उदय गायकवाड, महेश जाधव, आर.के. पोवार, दिलीप देसाई, कमलाकर जगदाळे, बाबा पार्टे, अनुप पाटील, रणजित केळुसकर यांच्यासह विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सूचना मांडल्या.

महापालिकेकडून भव्यदिव्य विसर्जन

प्रशासक के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, भाविकांनी काहिली विसर्जित केलेल्या गणेशमूर्तींचे इराणी खणीत भव्यदिव्य पद्धतीने पुन्हा विसर्जन केले जातील. मूर्तींचा अवमान होणार नाही. भागा-भागातील विसर्जित गणेशमूर्ती नेण्यासाठी २१५ वाहने व ७७० हमाल तीन ते चार शिफ्टमध्ये कार्यरत असतील. यासह काहिलींची संख्या वाढवली आहे. पंचगंगा घाटावरील कुंडात नदीतीलच पाणी वापरले जाईल. खड्डे भरण्यासाठी महापालिकेच्या २ कोटींच्या स्वनिधीतून निविदा प्रक्रिया व वर्कऑर्डर दिली आहे. प्रत्येक वॉर्डात दोन ठेकेदारांकडून काम करून घेतले जात आहे. चप्पल लाईनचा मार्ग उत्सवापूर्वी पूर्ण केला जाईल. मंडळांच्या सूचनांची आठवडाभरात पूर्तता केली जाईल.

पोलीस प्रशासनाच्या सूचना 

  • देखावे पाहण्यासाठी स्त्री-पुरुषांच्या रांगा वेगळ्या ठेवा.
  • परवान्यासाठी उपविभागीय कार्यालयात एक खिडकी योजना.
  • रात्री दहानंतर देखाव्यासह अन्य साऊंड सिस्टीमवर बंदी.
  • आगमन व विसर्जन मिरवणुका रेंगाळणार नाहीत याची काळजी घ्या.
  • बंदी घातलेले फटाके वाजवू नका.
  • पानसुपारीसाठीचे मांडव एकाच बाजूला व कमी जागेत उभारा.
  • लेसर लाईटमुळे डोळ्यांना इजा तसेच कॅमेरे, मोबाईल खराब झाल्याने लेसर लाईट वापरू नका.


..तर वाहन क्रेनने उचलू

पोलीस अधीक्षक पंडित म्हणाले, प्रत्येक मंडळाला सायंकाळी ७ ते १० या वेळेत महाद्वार रोडवर यायचे असते. मात्र, मिरवणुकीत दिलेल्या क्रमांकानुसारच मंडळांनी वाहने लावावीत. आदल्या दिवशी ट्रॉली, ट्रॅक्टर आणून महाद्वारावर लावल्यास क्रेनने उचलण्यात येतील. कागदी फुले उडविण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर वाहनांवर लावू नये, साऊंड सिस्टीमचे स्ट्रक्चर वाहनाबाहेर येऊ नये.

या पाच दिवशी रात्री १२ पर्यंत परवानगी

गणेश चतुर्थी, उत्सवाचा ६ वा दिवस तसेच ९वा, दहावा व अकरावा दिवस या पाच दिवशी १२ पर्यंत साऊंड सिस्टीमला परवानगी असेल. अन्य दिवशी १० वाजल्यानंतर ध्वनी यंत्रणा बंद करावी लागेल .

Web Title: CCTV watch at Ganeshotsav in Kolhapur for women's safety; Police gave instructions to the circles regarding the procession, sound system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.