काळभैरी यात्रेतही सीसीटीव्हीचा वॉच!
By admin | Published: February 18, 2016 11:42 PM2016-02-18T23:42:11+5:302016-02-19T00:21:40+5:30
गडहिंग्लजची २४ ला यात्रा : अधिकाऱ्यांकडून यात्रास्थळाची पाहणी
गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरीच्या वार्षिक यात्रेतही ‘सीसीटीव्ही’चा वॉच राहणार आहे. भाविकांच्या गर्दीमुळे होणाऱ्या अनुचित प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचा निर्णय झाला. दोन दिवसांच्या यात्रेला मंगळवारी (दि. २३) पालखी मिरवणुकीने प्रारंभ होईल. बुधवारी (दि. २४) यात्रेचा मुख्य दिवस आहे.सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार, तहसीलदार हनुमंत पाटील, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, आदींसह विविध खात्यांच्या प्रमुखांनी डोंगरावरील यात्रास्थळाची पाहणी केली. यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी तत्काळ दूर करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या. जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष निरंजन कित्तूरकर, मारुती राक्षे यांनीही सूचना मांडल्या.डोंगरावरील मंदिर परिसरात जाळ रेषा काढण्याची सूचना करण्यात आली. अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून नैवेद्य दाखवून परत घरी घेऊन जावे, आंबील वाटप व नारळ कमानीबाहेर फोडावेत, असे भाविकांना आवाहन करण्यात आले आहे.यावेळी गटविकास अधिकारी शाम वाखार्डे, सहायक गटविकास अधिकारी प्रदीप जगदाळे, वनखात्याचे राजन देसाई, तालुका आरोग्य अधिकारी मल्लिकार्जुन अथणी, नगरपालिकेचे जलअभियंता जमीर मुश्रीफ, आण्णाराव रिंगणे, विठ्ठल भमानगोळ, सुधीर पाटील, आदींसह मंदिराचे पुजारी, मानकरी, अवनी फौंडेशन व अनिरूद्ध उपासना केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पोलिओ लसीकरण
पल्स् पोलिओचा डोस चुकू नये म्हणून यात्रेत पल्स् पोलिओ लसीकरण पथक तैनात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर १०८ रूग्णवाहिकेसह तीन रूग्णवाहिका आणि आरोग्य पथकही सज्ज ठेवण्यात येणार आहे.