बकरी ईद घरीच साजरी करा, शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 04:18 PM2020-07-27T16:18:42+5:302020-07-27T16:22:24+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच बकरी ईद साजरी करावी. नमाजही घरीच अदा करावी आणि शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई केले आहे.
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच बकरी ईद साजरी करावी. नमाजही घरीच अदा करावी आणि शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई केले आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे शनिवार १ ऑगस्टला बकरी ईद साजरी करतानाही दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी न करता, आपल्या घरीच अदा करावी, असेही सूचनेत नमूद करण्यात आले आहे.
सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरून खरेदी करावीत.
प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईदनिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही. ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये.