शिवजयंती १९ तारखेलाच साजरी करा
By admin | Published: February 7, 2017 12:49 AM2017-02-07T00:49:20+5:302017-02-07T00:49:20+5:30
उमेश पोवार : सोमवारी प्रबोधन रॅली; ‘सकल मराठा मावळा’चे आवाहन
कोल्हापूर : महाराष्ट्रात सर्व महापुरुषांची जयंती एकाच दिवशी साजरी केली जात असताना शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मात्र वर्षातून तीनवेळा साजरी करून शिवप्रेमींमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. हे टाळून या महापुरुषाची जयंती १९ फेब्रुवारीलाच सर्वांनी साजरी करावी, असे आवाहन सकल मराठा मावळाचे संघटक उमेश पोवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.
ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या इतिहास अभ्यासकांच्या समितीने १९ फेब्रुवारी हीच शिवाजी महाराजांची खरी जन्मतारीख आहे हे सिद्ध केले आहे, तरीही शिवजयंतीच्या तारखेचा वाद काढून शिवप्रेमींमध्ये फूट पाडली जात आहे. राजमाता जिजाऊंची जयंती १२ जानेवारीला, महात्मा फुलेंची जयंती ११ एप्रिलला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती १४ मे रोजी, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती २६ जूनला आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंची जयंती १ आॅगस्टला साजरी केली जाते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेप्रमाणे साजरी न करता तिथीप्रमाणे साजरी करण्याचा आग्रह केला जातो, असा आग्रह शिवप्रेमींमध्ये फूट पाडणारा आहे. यासाठी सर्व नागरिकांनी व तरुण मंडळांनी एकत्र येऊन १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी. यावेळी विजयकुमार पाटील, संदीप बोरगांवकर, अभिषेक मिठारी, अनिकेत सावंत, नंदकिशोर सुर्वे, नीलेश चव्हाण, रणजित चव्हाण, अनिकेत शिंदे, ओंकार साळोखे, अनिकेत पाटील, आदी उपस्थित होते.
जनजागृती
शिवजयंतीविषयी नागरिक व तरुण मंडळांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सोमवारी (दि. १३) प्रबोधन रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता बिंदू चौक येथून अत्यंत शिस्तबद्धरीत्या ही रॅली काढली जाईल. त्यात ‘एकच वारी १९ फेब्रुवारी’, ‘जगात भारी १९ फेब्रुवारी’, ‘घरोघरी १९ फेब्रुवारी’ अशा घोषणांचे झेंडे असतील. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, शिवाजी चौक असा रॅलीचा मार्ग असेल.
मंडळांना तीन फुटी पुतळा देणार भेट
उमेश पोवार म्हणाले, एकाच दिवशी शिवजयंती साजरी व्हावी यासाठी शहरातील पेठा-पेठांमधील तरुण मंडळांशी संपर्क साधून त्यांना आवाहन केले जात आहे. जी मंडळे १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करणार आहेत व ज्यांच्याकडे शिवरायांची उत्सवमूर्ती नाही त्यांना संघटनेतर्फे शिवरायांची तीन फूट उंचीचा पुतळा भेट देण्यात येणार आहे, तरी अशा मंडळांनी ११ तारखेपर्यंत अतुल शॉपी (मारुती मंदिराशेजारी, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.