‘जागतिक क्षयरोग दिन’ जनजागृती कार्यक्रमाने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:08 AM2019-03-27T11:08:59+5:302019-03-27T11:10:16+5:30
जनमोहीम उघडली तर या आजारावरही विजय मिळू शकतो. आपण पोलिओला ज्याप्रमाणे हद्दपार केले, त्याप्रमाणे क्षयरोगालाही हद्दपार करूया, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी केले. जिल्हा क्षयरोग केंद्र, कोल्हापूर, कार्यालयामार्फत आयोजित जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कोल्हापूर : जनमोहीम उघडली तर या आजारावरही विजय मिळू शकतो. आपण पोलिओला ज्याप्रमाणे हद्दपार केले, त्याप्रमाणे क्षयरोगालाही हद्दपार करूया, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी केले. जिल्हा क्षयरोग केंद्र, कोल्हापूर, कार्यालयामार्फत आयोजित जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, मी स्वत: डॉक्टर असल्यामुळे क्षयरोग आजाराबाबत मला संपूर्ण माहिती आहे. हा आजार योग्य उपचाराने बरा होतो, हेही तितकेच खरे आहे. क्षयरोगाबाबत जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. सगळ्यांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. क्षयरोग रुग्णांची नोंद खासगी डॉक्टरांनी करणे बंधनकारक आहे. समाजामधील सर्व घटकांनी मिळून टी.बी.बद्दल जनमोहीम उघडली तरच या आजारावर आपण विजय मिळवू शकतो.
आपल्याकडे शासकीय विभागात टी.बी.बद्दल अत्यंत उच्च दर्जाचे तंत्रज्ञान (सी.बी. नँट मशीन) मोफत उपलब्ध आहे. ज्याद्वारे दोन तासांत त्याचे निदान होते. त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन हा लढा लढला पाहिजे; तरच मुळासकट याचे उच्चाटन होईल.
तत्पूर्वी सकाळी सीपीआर रुग्णालय परिसरातून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते क्षयरोग जनजागृती रॅलीचे उद्घाटन झाले. यात शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. डॉ. उषा कुंभार यांनी प्रास्ताविक केले; तर डॉ. अनिल मडके (कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन) यांनी क्षयरोगावर प्रबोधनपर व्याख्यान दिले. लक्षणे व आधुनिक उपचार याबद्दलही माहिती दिली. यानिमित्त झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ झाला.
डॉ. मानसी कदम यांनी मान्यवरांचे आभार मानले. एम. एस. पाटील व नामदेव सावंत यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. पी. पी. धारूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नावर, आरोग्य व कुटुंबकल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सी. जी. शिंदे, आदी उपस्थित होते.