सखींच्या जल्लोषात रंगले स्नेहसंमेलन, कोल्हापूरात रंगारंग कलाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 05:25 PM2019-04-26T17:25:14+5:302019-04-26T17:28:06+5:30
गणेशा वंदना, आई अंबाबाईचा गोंधळ, राजस्थानी संस्कृती मांडणारे घुमर नृत्य, विठू माउलींचा गजर आणि वारकरी संप्रदायाची परंपरा, लावणी, फॅशन शो आणि सहस्त्रम बॅन्डने सादर केलेली रॉकिंग गाणी अशा बहारदार सादरीकरणाने गुरुवारी ‘लोकमत सखी मंच’ आयोजित ‘सखी जल्लोष’ कार्यक्रम रंगला.
कोल्हापूर : गणेशा वंदना, आई अंबाबाईचा गोंधळ, राजस्थानी संस्कृती मांडणारे घुमर नृत्य, विठू माउलींचा गजर आणि वारकरी संप्रदायाची परंपरा, लावणी, फॅशन शो आणि सहस्त्रम बॅन्डने सादर केलेली रॉकिंग गाणी अशा बहारदार सादरीकरणाने गुरुवारी ‘लोकमत सखी मंच’ आयोजित ‘सखी जल्लोष’ कार्यक्रम रंगला.
केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सहस्त्रम रॉक बॅन्डचे विशाल सुतार, मयुरी डान्स अॅन्ड फिटनेस अकॅडमीच्या मयुरी सुतार, क्वेस्ट टूर्सच्या पूजा घाटगे, मॅक्सचे सुशांत पाटोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
स्त्रीचे आयुष्य म्हणजे स्वत:ची नोकरी व्यवसाय, कुटुंबाची जबाबदारी, पाहुण्यांचा राबता अख्ख्या घराचा डोलारा यशस्वीपणे सांभाळताना स्वत:ची हौस, छंद, आवडी-निवडी जोपासण्याची संधीच मिळत नाही. मिळाली तर व्यासपीठ नसते; पण मनांत सुप्त इच्छा असते मनसोक्त जगण्याची आणि हौस पूर्ण करण्याची.
सखींच्या या इच्छेला कृतीचे पाठबळ देत ‘लोकमत सखी मंच’ने सखींना रंगमंचावर थिरकण्याची संधी दिली. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांनाही रंगमंचावर थिरकण्याची हौस पूर्ण करता यावी, यासाठी ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने ‘सखी जल्लोष’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले; त्यासाठी सखींना मयुरी डान्स अॅन्ड फिटनेसच्या मयुरी सुतार यांनी नृत्याचे प्रशिक्षणही दिले. शालेय जीवनात कधीतरी गॅदरिंगमध्ये नृत्याची हौस भागली होती. आता इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा नृत्य सादरीकरण करताना महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाची सुरुवात झाली ती सखींनी सादर केलेल्या गणेश वंदनाने. त्यानंतर राजस्थानी नृत्य व संस्कृतीचे दर्शन घडविणारे घुमर, आयो रे मारो ढोलना या गीतांवर महिलांनी नृत्य सादर केले. मयुरी डान्स अँड फिटनेस स्टुडिओच्या ग्रुपने सादर केलेल्या माउली स्पेशल परफॉर्मन्सला सखींनी उभे राहून टाळ्यांच्या गजराने दाद दिली. त्यानंतर झालेल्या ‘फॅशन शो’ मध्ये सखी आधुनिक वेशभूषा करून रॅम्पवर उतरल्या.
लावणीने कार्यक्रमात रंगत आणली. सहस्त्रम रॉक बँडच्या कलाकारांनी मेरे रश्के कमर, लग जा गले, सैराट अशा नव्याजुन्या गीतांच्या सादरीकरणाने सखींना थिरकायला लावले. प्रिया देसाई यांनी खुमासदार शैलीत निवेदन केले. सर्व सहभागी सखींना प्रमाणपत्र व मॅक्सकडून चित्रपटाचे तिकीट देण्यात आले.
पर्यटन क्षेत्रात अग्रगण्य नाव असलेले क्वेस्ट टूर्स कार्यक्रमाचे ट्रॅव्हल पार्टनर होते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक यशस्वी सहलींचे आयोजन त्यांनी केले आहे. ‘लोकमत सखी मंच’ची हिमाचल प्रदेश सहलही त्यांच्या सहकार्याने ५ मे रोजी जात आहे. लवकरच बेंगलोर, उटी, म्हैसूर, सहलीचेही आयोजन केले जाणार आहे.
‘लोकमत सखी मंच’च्या लाईफ स्टाईल बुकचे वितरण शुक्रवारपासून सुरू झाले आहे. ज्यांना अद्यापही पुस्तक मिळाले नसेल त्यांनी आपल्या जवळच्या कमिटी मेंबरकडून घ्यावे.