कोरोनाचे नियम पाळत महावीर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:21 AM2021-04-26T04:21:06+5:302021-04-26T04:21:06+5:30
कोल्हापूर : कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करीत शहरात रविवारी भगवान महावीर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. विविध मंदिरांमध्ये ...
कोल्हापूर : कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करीत शहरात रविवारी भगवान महावीर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. विविध मंदिरांमध्ये पंडित आणि मानकरी यांच्या उपस्थितीत पूजा सोहळा, धार्मिक विधी करण्यात आले. जैनधर्मीय, बांधवांनी मंदिरांत जाण्याऐवजी घरातूनच भगवान महावीर यांना वंदन केले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोल्हापूर जैन समाज भगवान महावीर प्रतिष्ठानतर्फे भगवान महावीर जयंती महोत्सव रद्द करण्यात आला. सर्व श्रावक, श्राविकांनी आपल्या घरी प्रतिमापूजन करून परिवारासोबत घरीच महावीर जयंती उत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतेश सांगरूळकर आणि सचिव सुरेश मगदूम यांनी केले होते. त्याला जैन बांधवांनी प्रतिसाद दिला. शहरातील विविध परिसरांतील जैन बांधवांच्या मंदिरांमध्ये फुले, रांगोळी, विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती. गंगावेश येथील पार्श्वनाथ मानस्तंभ जैन मंदिरामध्ये स्थानिक पुजारी यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक पूजा आणि पाळणा झाला. दसरा चौक येथील दिगंबर जैन बोर्डिंगमधील श्री १००८ अनंतनाथ दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकाळी नऊ वाजता पूजाविधी आणि नामकरण सोहळा झाला. मंदिरातील पंडित व मानकरी संकेत उपाध्ये आणि सपना उपाध्ये यांच्या हस्ते पूजा विधी करण्यात आला. निशिधी (मुनी समाधी) येथे जलाभिषेक करण्यात आला. येथील मंदिरात पालकमंत्री सतेज पाटील, दिगंबर जैन बोर्डिंगचे अध्यक्ष सुरेश रोटे, संचालक अतुल होनुले यांनी दर्शन केले. रुईकर कॉलनीतील महावीर दिगंबर जैन मंदिरात पारंपरिक पद्धतीने महावीर जन्मकाळ महोत्सव साजरा करण्यात आला. भगवान महावीर यांच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक करण्यात आला. किरण उपाध्ये यांनी पूजा केली. सकाळी सात ते नऊ या वेळेत मंदिराच्या प्रवेशद्वारातून भाविकांनी दर्शन घेतले. शाहूपुरीतील श्री १००८ नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर, मंगळवार पेठेतील नेमिनाथ दिगंबर जिन मंदिर, शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन मठात जन्मकल्याणक सोहळा, पूजा, अभिषेक झाला.
चौकट
घरबसल्या पूजा सोहळ्याचे दर्शन
श्री १००८ अनंतनाथ दिगंबर जैन मंदिरातील पूजा सोहळा बोर्डिंगचे पर्यवेक्षक राजकुमार चौगुले यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह केला. त्यामुळे सर्व श्राविकांना घरबसल्या या सोहळ्याचे दर्शन घेता आले.