सोशल डिस्टन्सिंग पाळत वटपौर्णिमा साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:35 PM2020-06-05T17:35:01+5:302020-06-05T20:27:54+5:30
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत यंदा महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. सात जन्म हाच पती मिळावा, या प्रार्थनेत यंदा कोरोनाचे संकट दूर होऊ दे, अशी जोड देत वडाच्या महिलांनी वटवृक्षाचे पूजन केले. एरवी सुवासिनींच्या लगबगीने गजबजून जाणारा अंबाबाई मंदिराचा परिसर यंदा प्रथमच शांत होता.
कोल्हापूर : सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत यंदा महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. सात जन्म हाच पती मिळावा, या प्रार्थनेत यंदा कोरोनाचे संकट दूर होऊ दे, अशी जोड देत वडाच्या महिलांनी वटवृक्षाचे पूजन केले. एरवी सुवासिनींच्या लगबगीने गजबजून जाणारा अंबाबाई मंदिराचा परिसर यंदा प्रथमच शांत होता.
पावसाळ्याची सुरुवात, वटपौर्णिमा आणि पर्यावरण दिनाचा योगायोग यंदा जुळून आला. या दिवशी महिला वडाच्या झाडाचे पूजन करून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, अखंड सौभाग्यही मिळू दे, अशी कामना करतात. व्रतस्थ राहतात. भागाभागांतील महिला नटूनथटून या पूजनासाठी जातात.
यंदा मात्र या नटण्या-थटण्यात आणखी एका वस्तूची भर पडली तो म्हणजे मास्क! कोरोनाने सगळ्यांची दिनचर्याच बदलल्याने महिलांनाही मास्क घालून आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच हा दिवस साजरा करावा लागला.
दरवर्षी मोठ्या संख्येने महिला अंबाबाई मंदिराच्या परिसरातील रामाचा पार येथे वटपूजनासाठी येतात. या दिवशी या परिसरात पाय ठेवायलाही जागा नसते इतकी गर्दी होते. यंदा मात्र कोरोनामुळे अंबाबाई मंदिर अजूनही बंद असल्याने महिलांना आपल्या घराजवळील वडाच्या झाडाचा शोध घ्यावा लागला. शिवाय यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पाळला गेला.
अनेक महिलांनी कुंडीत वडाची फांदी लावून त्याचीच पूजा केली; तर बहुतांश महिलांनी प्रत्यक्ष झाडाचे पूजन करण्यावर भर दिला. ज्या-त्या भागातील मोजक्या महिलांनी एकत्र येत हा सण साजरा केला.
वडाचे झाड लावून पूजन
वडाचे पूजन करण्यासाठी त्याच झाडाची फांदी तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करायचा ही मानसिकता आता कमी होत आहे. महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झाली असून, या सणाला विधायकतेचे रूप देत महिलांनी ठिकठिकाणी वडाचे रोप लावून त्याचे पूजन केले.