कलाब्धि महोत्सवास प्रारंभ, पोलीस उद्यान बहरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 03:39 PM2020-02-22T15:39:52+5:302020-02-22T15:43:35+5:30
अभिजात भारतीय कलाविष्काराने कलाब्धि आर्ट फेस्टिवलला शनिवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने पोलीस उद्यानाच्या हिरवळीवर कलेला बहर आला देशभरांतील कलावंतांच्या मांदियाळीने रसिकांनाही कलेचा निस्सीम आनंद दिला.
कोल्हापूर : अभिजात भारतीय कलाविष्कारानेकलाब्धि आर्ट फेस्टिवलला शनिवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने पोलीस उद्यानाच्या हिरवळीवर कलेला बहर आला देशभरांतील कलावंतांच्या मांदियाळीने रसिकांनाही कलेचा निस्सीम आनंद दिला.
लघुचित्र शैली, वारली पेंटींग, निसर्ग चित्र, अॅक्रॅलिक,शिल्पकला, टेराकोटा, कागदकाम, क्लॉथ पेंटींग, हस्तकला, मांडणी शिल्प, मंदिर स्थापत्य शैली या कलांचे वैश्विक रुप यानिमित्ताने उलगडले.
महोत्सवाचे उदघाटन पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी अमृता जनवाडकर, डॉ. प्रियदर्शनी जैन, मानवी कामत, आर्किटेक्ट रीमा करंजगार, ग्रीष्मा गांधी, देविणा घाटगे, प्राचार्य अजेय दळवी, चित्रकार विजय टिपूगडे उपस्थित होते. भारतीयत्व ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून महोत्सवाची रचना करण्यात आली आहे.
यानंतर उद्यानाच्या हिरवळीत आणि झाडांच्या आच्छादनात भारतीय कलापरंपरा आकाराला येवू लागला. देशातील विविध भागातून आलेले कलावंत आपली कला या कलानगरीच्या रंगमंचावर सादर करत होते. महात्मा गांधींच्या काठीपासून ते भारताचे वैविध्यरुपांचे दर्शन घडवणारे, लेकुरवाळी विठू माऊली, प्राणी, व्यक्तिशिल्प नजर खिळवून ठेवणारे होते. दुसरीकडे कागदकामची कार्यशाळा सुरू होती. एकीकडे शालेय विद्यार्थी मांडणी शिल्प करण्यात गुंतले होते. यानंतर शिल्प स्पर्धा, प्रत्यक्षशिल्प स्पर्धा, शालेय मुलांचे मांडणी शिल्प, छायाचित्रण स्पर्धा अशा विविध स्पर्धा झाल्या.