शुक्लतीर्थावर रंगला भक्तीचा सोहळा

By admin | Published: August 13, 2016 12:53 AM2016-08-13T00:53:34+5:302016-08-13T00:54:05+5:30

भाविकांचे गंगास्नान : ‘दिगंबरा... दिगंबरा’चा अखंड गजर; वर्षभर पर्वणी सुरू राहणार

The celebration ceremony of Shankhartha in color | शुक्लतीर्थावर रंगला भक्तीचा सोहळा

शुक्लतीर्थावर रंगला भक्तीचा सोहळा

Next

नृसिंहवाडी/कोल्हापूर : ‘दिगंबरा... दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा... श्री गुरुदेव दत्त...’ असा अखंड जयघोष... अन् भक्तिमय वातावरणात शुक्रवारी सकाळी नृसिंहवाडी येथील शुक्लतीर्थावर लाखो भाविकांचा मेळा जमला. या ठिकाणी सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी ‘श्रीं’ची उत्सवमूर्ती व पादुकांवर गंगा-कृष्णा स्नान झाले.
शिरोळ येथील जयभवानी तोफेची तीन वेळा सलामी झाल्यावर भाविकांनी गंगा-कृष्णेच्या पाण्यात डुबकी मारून कन्यागत महापर्वाच्या प्रारंभातील या पर्वणीची अनुभूती घेतली. ही पर्वणी आता वर्षभर सुरू राहणार आहे. नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरातून गुरुवारी (दि. ११) दुपारी निघालेली ‘श्रीं’ची पालखी भाविकांच्या अभूतपूर्व उत्साहात रात्री उशिरा शुक्लतीर्थावर आली. येथील औदुंबराच्या झाडाजवळ ‘श्रीं’ची पालखी भाविकांच्या दर्शनासाठी विराजमान झाली. पालखीमार्ग पुष्पमाळांनी सजविलेल्या भव्य स्वागत कमानी, ठिकठिकाणी लावलेले ‘श्रीं’च्या नामस्मरणाचे फलक व दारोदारी रेखाटलेल्या रांगोळ्यांनी सजला होता.
विश्रांतीनंतर शुक्रवारी पहाटे करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते व विधीवत पूजा होऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, श्री नृसिंहसरस्वती दत्त देवस्थानचे अध्यक्ष राहुल पुजारी, सचिव संजय पुजारी, नृसिंहवाडीच्या सरपंच अरुंधती जगदाळे, उपसरपंच धनाजीराव जगदाळे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर ६ वाजून २० मिनिटांनी ‘श्रीं’ची उत्सवमूर्ती व पादुकांना विधीवतपणे शंकराचार्यांच्या उपस्थितीत शुक्लतीर्थ घाटावर नेऊन गंगा-कृष्णा स्नान घालण्यात आले. या क्षणाचे दर्शन घेऊन तो आपल्या डोळ्यांत साठविण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली. या स्नानानंतर तोफेची सलामी होऊन भाविकांनी पाण्यात डुबकी मारून गंगास्नान केले. या परिसरात श्रींच्या स्नानाचा सोहळा दत्तभक्तांना पाहता यावा, यासाठी प्रशासनाने आणि देवस्थान समितीने चोख व्यवस्था केली होती. पालकमंत्री पाटील, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही यावेळी स्नानाचा लाभ घेतला.
यावेळी मंदिर परिसरातील घाटावर भाविकांनी स्नानासाठी एकच गर्र्दी केली होती. ‘दिगंबरा... दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...’ या जयघोषात संपूर्ण परिसर व कृष्णाघाट स्नानसोहळ्याने फुलून गेला होता. लाखो भाविकांनी कृष्णातीरावरील घाटावर अभूतपूर्व स्नानाचा आनंद घेऊन पहिली पर्वर्णी उत्साहात साजरी केली. ‘श्रीं’च्या उत्सवमूर्र्तीचे पर्वकालस्नान झाल्यावर पुष्प अर्घ्य देऊन विधीवत पुण्याहवाचन, गंगापूजन, आदी कार्यक्रम होऊन सकाळी १० वाजता उत्सवमूर्ती शुक्लतीर्थावरून मुख्य मंदिराकडे येण्यासाठी निघाली.
प्रशासनाकडून चोख नियोजन
भाविकांच्या स्नानासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस दल तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने खबरदारी घेऊन चोख नियोजन केले होते. घाट परिसरात लोखंडी अडथळे उभारण्यात आले होते. दिवसभर भाविकांचे स्नान सुरू असताना एनडीआरएफ’, जीवनज्योत संस्थेचे जवान, मंदिर प्रशासनाचे स्वयंसेवक व आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी यांची सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बारीक नजर होती. नदीत ‘एनडीआरएफ’च्या २० बोटी व जिल्हा प्रशासनाच्या १० यांत्रिकी बोटी जवानांसह फिरत होत्या.
मिठाईची दुकाने बंद
पोलिस प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करीत येथील मेवा मिठाई व्यापारी यांनी स्वघोषित काहीकाळ बंद पुकारून प्रशासनाची तारांबळ उडविली. कन्यागतच्या पार्श्वभूमीवर येथे असणाऱ्या पोलिस फौजफाट्याने मंदिर मार्गावर एकेरी वाहतुकीचे नियोजन करून दोन दोन फुटांच्या अंतराने बॅरिकेटस् उभारल्याने येथे येणाऱ्या यात्रेकरूंंना त्रास, तर व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ लागले. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी संपूर्ण व्यापारपेठ बंद केली. यामुळे काही वेळ गोंधळ उडाला. त्यानंतर काही वेळाने पोलिस अधिकारी व व्यापारी असोशिएशनचे पदाधिकारी यांच्यात चर्चा होऊन मंदिर परिसरात दुतर्फा वाहतुकीस परवानगी दिली.
नेटके संयोजन
दत्त देवस्थान परिसरात संजय घोडावत ग्रुपच्यावतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. स्नानाचे नियोजन पोलिस, स्वयंसेवक, व्हाईट आर्मी, जीवनज्योती, एन.सी.सी. व अनिरुद्ध उपासना केंद्राचे स्वयंसेवक, आदींनी नियोजन केले. ठिकठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात आली होती.

आठ प्रमुख पर्वण्या
आता पुढे वर्षभर हा सोहळा कृष्णातीरावर सुरूच राहणार आहे. सोहळ्याच्या वर्षभरात जवळपास ५० पर्वण्या असून त्यामध्ये आठ प्रमुख पर्वण्या आहेत. १२ आॅगस्ट २०१६, २० सप्टेंबर २०१६ तर पुढील वर्र्षी १४ जानेवारी २०१७, २५ मार्च २०१७, ९ जुलै २०१७, ७ आॅगस्ट २०१७, २१ आॅगस्ट २०१७ आणि १२ सप्टेंबर २०१७ या तारखांना या पर्वण्या होणार आहेत.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडीसह शिरोळ येथे भोजनपात्र मंदिर, औरवाड येथे अमरेश्वर मंदिर, गणेशवाडी येथे स्वयंभू गणेशमंदिर आणि खिद्रापूर येथे पुरातन कोपेश्वर मंदिर यासह कृष्णातीरावरील अमरापूर, औरवाड, आलास, गौरवाड, बुबनाळ, गणेशवाडी, कवठेगुलंद, आदी गावांतही कन्यागत महापर्वकाळामध्ये भाविकांना स्नानाची पर्वर्णी लाभणार आहे.

Web Title: The celebration ceremony of Shankhartha in color

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.