बालपणाच्या उत्सवाला विधायकतेचे कोंदण, बालदिन उत्साहात : विविध उपक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 01:27 PM2019-11-15T13:27:27+5:302019-11-15T13:29:36+5:30
बालपण म्हणजे निरागस, निर्मळ, गोंडस आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणारा काळ. लहानग्यांच्या बाललीलांपासून ते अगदी वयोवृद्धांपासून सगळ्यांमध्ये लपलेल्या बालमनाला शुभेच्छा देत गुरुवारी बालदिन साजरा झाला. यानिमित्त लहान मुलांशी संबंधित विविध संस्था, संघटनांकडून बालहक्क जागृतीसंबंधीचे विधायक कार्यक्रम घेण्यात आले.
कोल्हापूर : बालपण म्हणजे निरागस, निर्मळ, गोंडस आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणारा काळ. लहानग्यांच्या बाललीलांपासून ते अगदी वयोवृद्धांपासून सगळ्यांमध्ये लपलेल्या बालमनाला शुभेच्छा देत गुरुवारी बालदिन साजरा झाला. यानिमित्त लहान मुलांशी संबंधित विविध संस्था, संघटनांकडून बालहक्क जागृतीसंबंधीचे विधायक कार्यक्रम घेण्यात आले.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन असलेला १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा होतो आणि या निमित्ताने बालपणाचा उत्सव साजरा होतो. गुरुवारी बहुतांश शाळा सुरू असल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. मुलांना खास खाऊही देण्यात आला. काही शाळांमध्ये खेळ, स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.
बालहक्क आणि अधिकारांसाठी काम करणाऱ्या ‘चाईल्डलाईन’तर्फे बालदिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले, त्याची सुरुवात बालकल्याण समितीचे सदस्य व्ही. बी. शेटे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी ‘चाईल्डलाईन’च्या कामाचे कौतुक केले. सांगली मिशन सोसायटीचे अध्यक्ष फादर ज्योबी यांनी ‘चाईल्डलाईन’ने मुलांच्या विकासाच्या कार्याला हातभार लावावा, अशी सूचना केली.
फादर रोशन वर्गीस यांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून वाचनाची आवड जोपासावी, असे सांगितले. केंद्र समन्वयक अनुजा खुरंदळ यांनी ‘चाईल्डलाईन’च्या कामाची माहिती दिली; तसेच मुलांना काही मदत हवी असल्यास १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.
दरम्यान, भवानी मंडप, शिवाजी चौक, बिंदू चौक, रेल्वेस्थानक येथे पथनाट्याद्वारे मुलांच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. विविध सामाजिक संस्थांकडून बालचमूंना शालेय साहित्य, खेळणी, खाऊ देण्यात आला.
दत्ताबाळ हायस्कूलमध्ये शिक्षक दिगंबर बालदे यांनी पंडित नेहरूंच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली. यावेळी अध्यक्षा पल्लवी देसाई, सचिव नीलेश देसाई, व्यवस्थापक संदीप डोंगरे, मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे उपस्थित होत्या.
बालपणाची आठवण
बालदिनाच्या निमित्ताने अनेकांनी आपली बालपणाची छायाचित्रे समाजमाध्यमांवरून प्रसारित केली. प्रत्येक व्यक्तीमध्ये दडलेल्या बालमनाला साद घालत शुभेच्छा देण्यात आल्या. काहीजणांनी आपल्या कुटुंबातील लहानग्यांचे निरागस फोटो प्रसारित केले. त्यामुळे बालदिन केवळ लहान मुलांपुरता मर्यादित न ठेवता सगळ्यांनीच आपल्या बालपणीच्या आठवणी जागविल्या.