जाळ अन् धूर, मोठ्या एलईडी स्क्रीन; मेस्सीचा अर्जेंटिना विजयी, कोल्हापुरात जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 05:24 PM2022-12-19T17:24:23+5:302022-12-19T17:25:03+5:30
एम्बापे आणि संघातील कॉम्बिनेशनची चर्चा
कोल्हापूर: कतारमध्ये सुरु असलेला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यातील अतिम लढतीची थरार रविवारी रात्री कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमीनी मोठमोठया एलईडी स्क्रीनवर अनुभवला. मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने विजेतेपद पटकाविल्यानंतर कोल्हापुरातील चाहत्यांनी फटाक्याची आतषबाजी करीत आनंद लुटला.
गेली २८ दिवस जगभरातील फुटबॉल चाहत्यांसह कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमींनीही याचा आनंद लुटला. अर्जेंटिना विश्वविजेता ठरेल असा अंदाज कोल्हापूरकरांनी बांधला होता. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच अंतिम सामन्यातील लढतीची उत्सुकता कोल्हापूरकरांमध्ये लागून राहिली होती. अखेरीस सामना सुरू झाला आणि मेस्सीला ढकलल्यामुळे मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर मेस्सीने अचूक गोल नोंदवला. यानंतर डी मारिओ गोल केला उत्तरार्धात फ्रान्सच्या एम्बापेने ८० आणि ८१ व्या मिनिटात गोल केल्यानंतर सामना २-२ असा उत्कंठावर्धक स्थितीत आला.
जादा वेळेत मेस्सीने गोल नोंदवला. त्यानंतर फ्रान्सच्या एम्बापेने तिसरा गोल करीत सामना ३-३ असा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या स्थितीत आला आणि पेनल्टी स्ट्रोकवर सामना जिंकताच चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पारंपरिक वाद्ये आणि डीजेच्या गजरात जल्लोष केला. रात्री उशिरापर्यंत जल्लोष सुरु होता.
मेस्सी'साठी देव पाण्यात
कोल्हापुरात ब्राझीलसोबत अर्जेंटिना संघावर अफाट प्रेम करणारी मंडळी होती. अर्जेंटिनानेच फिफा विश्वचषक जिंकावा म्हणून देव पाण्यात ठेवून होते. अनेकांनी देवाकडे मेस्सीचा संघ जिंकू दे यासाठी प्रार्थना केली. ज्याच्या त्याच्या तोडी मेस्सीच होता.
शहरातील प्रमुख चौकात मोठ्या एलईडी स्क्रीन
शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक, निवृती चौक, जुना बुधवार पेठ, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, खासबाग चौक, मंगळवार पेठ, जावळाचा गणपती, काळा टॉवर, एस.पी. बॉईज चौक, शनिवार पेठ, दिलबहार तालीम मंडळ, टॅबेरोड, फुलेवाडी दत्तमंदिरजवळ, कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानाजवळ बिग स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.
एम्बापे आणि संघातील कॉम्बिनेशनची चर्चा
फ्रान्सचा संघ सलग दुसऱ्यांदा जिंकण्यासाठी त्याचा सुपरस्टार किलीयन एम्बापे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतिम सामन्यासाठी अवलंबलेली पद्धतीचा अवलंब स्थानिक संघानीही करावा असे चर्चा कोल्हापूरच्या टबॉलप्रेमींमध्ये सामना संपल्यानंतर होती.