धार्मिक-सामाजिक उपक्रमांनी महाशिवरात्री साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:41 AM2021-03-13T04:41:44+5:302021-03-13T04:41:44+5:30
कोल्हापूर : ओम नम: शिवायचा जाप, रुद्राभिषेक, बेल, धूप, आरती, फुला-पानांची सुरेख आरास, कीर्तन, भजन अशा धार्मिक विधींबरोबरच ...
कोल्हापूर : ओम नम: शिवायचा जाप, रुद्राभिषेक, बेल, धूप, आरती, फुला-पानांची सुरेख आरास, कीर्तन, भजन अशा धार्मिक विधींबरोबरच सामाजिक उपक्रमांनी गुरुवारी कोल्हापुरात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. कोरोनाच्या धर्तीवर शिव मंदिरांच्या व्यवस्थापनाने गर्दी टाळण्यासाठी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवले होते. तर तरुण मंडळांनी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, मास्क वाटप या उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपली.
श्री शिवशंकराच्या आराधनेत महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोल्हापूर हे शिवाचे स्थान असल्याने शहरात अनेक ठिकाणी लहान- मोठी शिवमंदिरे आढळतात. पंचगंगा नदी घाटावरील तारकेश्वर हे पुरातन शिवमंदिर आहे. कोराेनामुळे शहरातील शिवमंदिरे भाविकांसाठी बंद केल्याने तारकेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. येथीलच आणखी एका शिवमंदिरात फुलांची सुरेश सजावट करण्यात आली.
कैलासगडची स्वारी मंदिरात सकाळी श्रींचा अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले. गंगावेशमधील ऋणमुक्तेश्वर मंदिरातदेखील धार्मिक विधी करण्यात आले. निवृत्ती तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर घेण्यात आले. नगरसेवक ईश्वर परमार व अजित ठाणेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिरात समितीतर्फे पूजाअर्चा करण्यात आली. येथील अतिबलेश्वर मंदिरातही भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
---
१० किलो झेंडू, ५ किलो शेवंती, बेल आणि मोगऱ्याची आरास
शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्लीतील श्री महादेव मंदिरात १० किलो झेंडूची फुले, ५ किलो शेवंतीची फुले तसेच एक किलो बेलपत्रांचा आणि एक किलो मोगऱ्याचा गजरा यांचा वापर करून मनमोहक आरास करण्यात आली. ही पूजा रोशन जोशी, प्रथमेश सरनाईक, उमेश जाधव, शुभम साळोखे, उद्धव पन्हाळकर यांनी बांधली. या सजावटीत सूर्येश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश सरनाईक, उपाध्यक्ष शुभम साळोखे तसेच सर्व कार्यकर्ते, सेवक सहभागी झाले होते.
---
फोटो नं ११०३२०२१-कोल-महाशिवरात्री०१
ओळ : महाशिवरात्रीनिमित्त पंचगंगा नदीघाटावरील तारकेश्वर मंदिरात भाविकांनी शिवलिंगाचे पूजन केेले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--
०२
पंचगंगा घाटावरील एका शिव मंदिरात अशी सुरेख आरास करण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--
०३
गंगावेशमधील ऋणमुक्तेश्वर मंदिराबाहेरूनच भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. (छाया : आदित्य वेल्हाळ)