येत्या शनिवारपासून सुट्ट्यांची पर्वणी; पर्यटनस्थळे गजबजणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 04:27 PM2023-08-07T16:27:06+5:302023-08-07T16:33:18+5:30

पावसाळी पर्यटनाचे नियोजन

Celebration of holidays from Saturday; Tourist place will be crowded | येत्या शनिवारपासून सुट्ट्यांची पर्वणी; पर्यटनस्थळे गजबजणार

येत्या शनिवारपासून सुट्ट्यांची पर्वणी; पर्यटनस्थळे गजबजणार

googlenewsNext

कोल्हापूर : राज्याच्या काही भागात झालेला दमदार पाऊस अन् त्यातच सलग चार दिवस जोडून सुट्ट्या येत असल्याने विविध पावसाळी व धार्मिक पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे बेत अनेकांकडून आखले जात आहेत.

दुसरा शनिवार आणि रविवार सुट्टी, सोमवारी रजा टाकल्यावर मंगळवारची स्वातंत्र्य दिनाची आणि बुधवारी पारसी नववर्षाची सुट्टीही जोडून येत असल्याने अनेकजण सहकुटुंब भटकंतीवर निघणार आहेत. परिणामी कोल्हापूर परिसरासह आसपासची धार्मिक व पर्यटनस्थळे या काळात गजबजणार असल्याची चिन्हे आहेत. बँक आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हे पाच दिवस ‘लयभारी’ अर्थात आनंदाचे जाणार आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

स्वातंत्र्य दिन आणि पारसी नववर्षाच्या सुट्ट्यांना जोडून आलेल्या शनिवार, रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना १२ ऑगस्टपासून चार दिवस सुट्ट्यांची पर्वणी मिळाली आहे. सलग सुट्ट्या आल्या की, कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे कोल्हापूर शहरातील पर्यटन शनिवारपासून वाढणार आहे. देवदर्शन, निसर्गरम्य ठिकाणे आणि ऐतिहासिक स्थळांवर फिरण्याची पर्वणी मिळत असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटक हॉटेल बुक करू लागले आहेत.

पावसाळी पर्यटनाचे नियोजन

मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईसह निसर्गप्रेमी मंडळींनी अशा पावसाळी पर्यटन सहलींचे नियोजन केल्याचे चित्र आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी तर आधीच रिझर्वेेशनदेखील केलेले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्यानंतर ही मंडळी आता थेट गुरुवारी सकाळीच कामावर परतणार आहेत.

या ठिकाणांना पसंती

सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक, भाविक तसेच उत्साही ट्रेकर्सकडूनही पावसाळी पर्यटन आणि देवदर्शनासाठी आगामी तीन-चार दिवस पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील राधानगरी, कोकणातील आंबोलीतील कावळेसाद येथील धबधबे, गणपतीपुळे, मालवणचे समुद्रकिनारे, गोव्यासह स्थानिक पन्हाळा, राधानगरी, जोतिबा, नृसिंहवाडी, अंबाबाई मंदिर, कणेरीमठ, न्यू पॅलेस यासारख्या ठिकाणांना पसंती अधिक आहे.
 

Web Title: Celebration of holidays from Saturday; Tourist place will be crowded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.