बावड्यातील स्मशानभूमी चोवीस तास धगधगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:23 AM2021-05-13T04:23:16+5:302021-05-13T04:23:16+5:30
रमेश पाटील कसबा बावडा : एरवी आठवड्यातून चार ते पाच मृतदेहांवर जिथे अंत्यसंस्कार व्हायचे ती कसबा बावड्यातील स्मशानभूमी सध्या ...
रमेश पाटील
कसबा बावडा : एरवी आठवड्यातून चार ते पाच मृतदेहांवर जिथे अंत्यसंस्कार व्हायचे ती कसबा बावड्यातील स्मशानभूमी सध्या २४ तास धगधगत असल्याचे चित्र आहे. या स्मशानभूमीत दररोज १२ ते १३ नॉन कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. या स्मशानभूमीत १४ अंत्यसंस्काराचे ओटे असल्याने नवीन आलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ओट्यांची उपलब्धता व्हावी यासाठी सकाळी अंत्यसंस्कार झाले की त्याच दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास रक्षाविसर्जन उरकून घ्यावे लागत आहेत. कोल्हापूर शहरातील नॉन कोविड मृतदेहांवर बावडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत आहेत.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडत असलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याची बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात न देता महापालिकेच्यावतीने शहरातील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावयाच्या मृतदेहांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नॉन कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ते मृतदेह कसबा बावडा स्मशानभूमीकडे पाठवले जात आहेत.
कसबा बावडा स्मशानभूमीच्या ओट्यांची संख्या १४ आहे. येथे आठवड्यातून तीन ते चार मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत होते. परंतु आता कोल्हापूर शहरातून इकडे मृतदेह पाठवण्यात येऊ लागल्याने बावडा स्मशानभूमी नेहमीच धगधगत आहे. अनेक वेळेला येथील १४ ही ओट्यांवर अंत्यसंस्कार झाले असल्याने नवीन मृतदेहाला अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे संबंधितांच्या नातेवाईकांना प्रतीक्षा करावी लागत होती.
आता मात्र बावडा स्मशानभूमीत नॉन कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर संबंधित नातेवाईकांना त्याच दिवशी रक्षाविसर्जन कार्यक्रम उरकून घ्यावा, अशा सूचना केल्या जात आहेत. गंभीर परिस्थिती ओळखून संबंधित नातेवाईक त्याच दिवशी रक्षाविसर्जन उरकून टाकत आहेत.
दरम्यान, बावडा स्मशानभूमीत महानगरपालिकेचे कर्मचारी निशिकांत कांबळे यांच्यासह एकूण आठ कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत. दिवस-रात्र या ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असल्याने कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण आला आहे. याठिकाणी आणखीन जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.
चौकट : स्मशानभूमीतही बेडसाठी धडपड....
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे आपल्या रुग्णाला बेड मिळावा यासाठी नातेवाईकांची धडपड सगळीकडेच पाहायला मिळते. मात्र, नॉन कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ओटे मिळत नसल्याने संबंधितांच्या नातेवाईकांचीही तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे.