सेन्सॉर बोर्डाचे काम आता आॅनलाईन

By Admin | Published: October 9, 2015 01:08 AM2015-10-09T01:08:03+5:302015-10-09T01:12:11+5:30

अरूण नलावडे : महाराष्ट्र शासन रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाची सभा

Censor Board's work is now online | सेन्सॉर बोर्डाचे काम आता आॅनलाईन

सेन्सॉर बोर्डाचे काम आता आॅनलाईन

googlenewsNext

रत्नागिरी : नाटक लिहिल्यानंतर रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाकडे तपासणी व मान्यतेसाठी पाठवले जाते. परिनिरीक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन लेखकाचा येण्या-जाण्याचा खर्च वाचावा व कोणाचीही अडवणूक होऊ नये याकरिता लवकरच महाराष्ट्र शासन रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाचे कामकाज आता आॅनलाईन सुरु करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी सांगितले.महाराष्ट्र शासन रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाची मासिक सभा बुधवारी रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती. सभेनंतर जिल्ह्यातील रंगकर्मी, नाट्यसंस्था, लेखक, दिग्दर्शक, माध्यमांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नलावडे बोलत होते. यावेळी भद्रकाली प्रॉडक्शन व ‘समुद्र’चे निर्माता प्रसाद कांबळी, ज्येष्ठ रंगकर्मी व लेखक, दिग्दर्शक अशोक समेळ उपस्थित होते.परिनिरीक्षक मंडळाकडे नाटकाची संहिता पाठवल्यानंतर ती दोन सदस्यांकडे वाचण्यासाठी दिली जाते. त्यानंतर मंडळाच्या बैठकीमध्ये सदस्य संहितेबद्दलचे आक्षेप नोंदवतात. त्यानंतर त्यावर चर्चा केली जाते. नंतर लेखकाला याबद्दल कळवले जाते. शिवाय संहितेबद्दल लेखकाला काही सांगायचे असेल तर त्यासाठी बोलावलेदेखील जाते. एकूणच खेळीमेळीच्या वातावरणात व चर्चेतून मार्ग काढला जातो अशी मंडळाच्या कामाची पद्धत नलावडे यांनी स्पष्ट केली. नवनवीन नाटके यावीत यासाठी मंडळ प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.नाटकाची संहिता परिनिरीक्षणासाठी पाठवल्यानंतर सहा महिने का लागतात? यावर नलावडे यांनी सांगितले की, मंडळ कोणाचीही अडवणूक होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. नाटक लिहिल्यानंतर लेखकाने तातडीने सेन्सॉर करुन घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच ते प्रयोगासाठी पाठवावे. एकांकिका किंवा नाट्य महोत्सवासाठी तातडीने संहिता द्यायची असेल तर तसे कळवावे. महिन्याभरात ते सेन्सॉर करुन पाठवले जाईल, असे सांगितले. जुने नाटक सादर करणाऱ्या संस्थेला नाटक सादर करण्यासाठी सेन्सॉरची परवानगी घ्यावीच लागेल.प्रत्यक्ष संहितेमध्ये लेखक वेगळे लिहितो. परंतु, कलाकारांकडून काही वेळा आक्षेपार्ह सादर केले जाते. काहीवेळा अश्लिल संवादही होत असतात. त्यावेळी लेखकाने किंवा निर्मात्याने नाटक सादर करत असतानाच नियम घालणे गरजेचे आहे. जेणेकरुन पाच ते १२ वर्षाखालील मुलांना नाटकाला प्रवेश नाकारले जाऊ नये. सेन्सॉर बोर्ड लेखकावर बंधन टाकू शकते कलाकारावर नाही.
संगीत नाटकांसाठी साडेतीन तासांपेक्षा कमी कालावधी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचलनालय नियम घालू पाहत आहे. यासाठी मंडळाला संस्थांनी पत्र पाठवून विनंती करावी. परंतु, जर नियम स्पर्धेसाठी लागू केला असेल तर कमी वेळेत नाटक सादरीकरण हे दिग्दर्शकाचे कौशल्य असेल असे विवेक आपटे म्हणाले. स्पर्धांसाठी येणाऱ्या संहिता मंडळाकडे येण्याचा ओघ वाढला आहे. अधिकाधिक लोकांकडे वाचायला देऊन प्रमाणपत्र देण्यासाठी सेन्सॉर बोर्ड प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी अ‍ॅड. संजय देशपांडे, माधव टिकेकर, दाक्षायणी बोपर्डीकर व अन्य सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)


रत्नागिरीत प्रथमच झाली परिनिरीक्षक मंडळाची बैठक.
नाट्यलेखकांचा येण्या - जाण्याचा खर्च वाचणार.
नवनवीन नाटके येण्यासाठी मंडळ प्रयत्नशील.
जुने नाटक सादरीकरणासाठी सेन्सॉरची परवानगी आवश्यक.
स्पर्धांसाठी येणाऱ्या संहितांचा ओघ वाढला.

Web Title: Censor Board's work is now online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.