शाहू महाराजांच्या शेतकरी धोरणाचा केंद्राने आदर्श घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:16 AM2021-06-27T04:16:22+5:302021-06-27T04:16:22+5:30
कोल्हापूर : शाहू महाराजांनी शेतकरी केंद्रबिंदू मानून कायदे केले, राज्यकारभार केला. या धोरणाचा केंद्र सरकारने आदर्श घ्यावा, असे आवाहन ...
कोल्हापूर : शाहू महाराजांनी शेतकरी केंद्रबिंदू मानून कायदे केले, राज्यकारभार केला. या धोरणाचा केंद्र सरकारने आदर्श घ्यावा, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे यांनी केले.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सात महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी देशभर आंदोलने झाली. कोल्हापुरातही अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या आवाहनानुसार किसान व कम्युनिस्ट पक्षाने बिंदू चौकात जोरदार निदर्शने करत केंद्र सरकारच्या हुकूमशाही धोरणांचा निषेध नाेंदवला. देशद्रोही मोदी हाय हाय, रद्द करा, रद्द करा काळे कायदे रद्द करा अशा घोषणा दिल्या. दरम्यान, लोकराजा शाहू महाराजांची जयंतीचे औचित्य साधून आंदोलकांनी दसरा चौकात पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर बिंदू चौकात एकत्र जमत निदर्शने केली. यावेळी शाहीर रंगराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाहू महाराजांवर जोशपूर्ण पोवाडा सादर केला. प्रा. सुनीता अमृतसागर यांनी शाहू महाराजांचा जीवनपट सांगितला. यावेळी किसान संघर्ष समन्वय समितीचे निमंत्रक नामदेव गावडे, ‘माकप’चे चंद्रकांत यादव, दिलीप पवार, संभाजीराव जगदाळे, अशोकराव साळोखे, प्रा. सुभाष जाधव, नामदेव पाटील, उत्तम पाटील यांची भाषणे झाली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, बाबासाहेब देवकर, संदीप देसाई आदी उपस्थित होते.