पाणी धोरणासाठी केंद्र, राज्याकडे पाठपुरावा : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 08:33 PM2017-11-03T20:33:13+5:302017-11-03T20:42:07+5:30
तासगाव/कवठेएकंद : धरणातील पाण्याला हजार, बाराशे रुपये आणि स्वत: तयार केलेल्या पाणी संस्थांच्या योजनांसाठी चार ते पाच हजार रुपये पाणीपट्टी अन्यायकारक आहे.
तासगाव/कवठेएकंद : धरणातील पाण्याला हजार, बाराशे रुपये आणि स्वत: तयार केलेल्या पाणी संस्थांच्या योजनांसाठी चार ते पाच हजार रुपये पाणीपट्टी अन्यायकारक आहे. पाणी मिळविण्याचे धोरण निश्चित करायला हवे. सिंचन योजनेच्या वीज बिल दरात सवलत दिली पाहिजे. स्व:कर्तृत्वावर उभारलेल्या पाणी योजनांची पाणीपट्टी शासनाच्या पाणी योजनेप्रमाणे आकारली येईल, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे एकत्रित मागणी करू, अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी दिली.
कवठेएकंद (ता. तासगाव) येथे सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा योजनेच्या रौप्यमहोत्सवी समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आ. पतंगराव कदम अध्यक्षस्थानी होते. यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील, आ. मोहनराव कदम, आ. धैर्यशील पाटील, माजी आमदार संपतराव पवार-पाटील,अरुण लाड प्रमुख उपस्थित होते.
पवार म्हणाले की, तासगावची सर्कस, तास गणेश द्राक्षे, स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष यात येथील लोकांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. येथील माणूस लाचारीने हात न पसरता हिमतीने लढणारा आहे. दुष्काळी भाग, पाणीटंचाई अशा परिस्थितीतही कवठेएकंदच्या शेतकºयांनी एक वचनाने शेतीची पाणी योजना उभी केली. आता दुष्काळी परिस्थिती, शेतीसमोरील अडचणी यासाठी सगळेजण बसून काम करू. यासाठी खासदार संजयकाकांचीही साथ मिळेल. डोक्यावर कर्जाचा बोजा घेऊन ही पाणी योजना गेली पंचवीस वर्षे चांगली चालवली आहे. एकीकडे आम्ही शासनाने बांधलेल्या धरणातील पाणी हजार ते बाराशे रुपये पाणीपट्टी भरून वापरतो, तर दुसरीकडे स्वत: कर्ज काढून उभ्या केलेल्या पाणी संस्थेतून चार-पाच हजाराची पाणीपट्टी भरून पाणी मिळते. हे बदलायला हवे. वीज दरवाढ व पाणीपट्टी यासाठी सवलत दिली पाहिजे. बागायती शेतीतून शेतकरी संपन्न होण्यासाठी पाणी योजनांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यायला हवे. त्यासाठी जयंत पाटील, पतंगराव कदम आम्ही मिळून केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, खासदार संजयकाकाही त्यासाठी साथ देतील.
आ. पतंगराव कदम म्हणाले की, पाणी योजना उभारणीच्या काळात आर. आर. पाटील यांनी सहकार्य केले. अडचणीच्या काळात भू-विकास बँकेच्या कर्जासाठी एकरकमी परतफेड योजना राबवून कर्जात व व्याजात मोठ्या सवलती दिल्या. धाडसी शेतकºयांनी योजना चांगल्याप्रकारे चालवली आहे. योजना उभारणीत एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. आपल्या खात्यात आपणच मुख्यमंत्री, अशा पध्दतीने त्यांनी जनतेची कामे केली. आज ‘पैसे मिळवा, इलेक्शन जिंका’ असे काम चालू आहे, पण हे तात्पुरते सुख आहे. सगळ्यांची कामे करा. सत्ता लोकांसाठी वापरा. महाराष्टÑातील शेती धोरणामध्ये पवार यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी आता आघाडीचे नेतृत्व करावे.
ज्येष्ठ शेतकरी सुरेंद्र सकळे व जयसिंगराव पाटील यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. रामचंद्र थोरात यांनी स्वागत केले. प्रा. बाबूराव लगारे यांनी प्रास्ताविकात, योजना उभारणीसाठी ज्या पिढीने योगदान दिले, अडचणीच्या काळात योजना चालविली, अशी मंडळी वृध्दापकाळाकडे जात आहेत. नव्या पिढीला योगदानाची जाणीव व्हावी, यासाठी रौप्यमहोत्सवाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य डी. के. पाटील, पंचायत समिती सभापती माया एडके, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अविनाश पाटील, डॉ. बाबूराव गुरव, सरपंच राजश्री पावसे, उपसरपंच विजयमाला लंगडे, पंचायत समितीच्या सदस्या बेबीताई माळी उपस्थित होते. सूर्यकांत पाटील यांनी आभार मानले.
कृतज्ञता सत्काराने गौरव
पाणी योजनेचे संस्थापक डॉ. नरेंद्र खाडे व शंकरराव माळी यांचा सपत्नीक सत्कार करून रौप्यमहोत्सवानिमित्त चांदीचा जलकुंभ देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यासह संचालक मंडळ व सेवकांचाही सत्कार करण्यात आला. योजना उभारणीच्या काळात योगदान देणाºया सभासद, शेतकºयांचा कृतज्ञता सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
साखर कारखानदारी आॅक्सिजनवर : शरद पवार
राज्यातील सहकार चळवळीला यशवंतराव चव्हाणांनी दिशा दिली. मात्र आज या गोष्टीची फार काळजी वाटते. आज काही ठराविक साखर कारखाने सोडले, तर बाकीचे कारखाने आॅक्सिजनवर आहेत. हे चित्र चांगले नसल्याची खंत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. तासगाव कारखाना बंद पडला. सांगलीसारखा मोठा कारखाना आर्थिक अडचणीत आला. कारखानदारी बंद पडल्यामुळे हजारो लोकांचे संसार अडचणीत येतात. शेतकºयांंचे नुकसान होते. त्याची काळजी घेतली पाहिजे, असे भावूक मत यावेळी पवारांनी व्यक्त केले.