पत्रकारांच्या दिशेवरच केंद्राची सत्ता ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:19 AM2019-01-07T00:19:01+5:302019-01-07T00:19:05+5:30
कोल्हापूर : आम्ही तीन राज्यांत हरलो म्हणून काय झाले, आमची मते जास्त आहेत, घाबरू नको, असे अंबाबाईच मला दृष्टांत ...
कोल्हापूर : आम्ही तीन राज्यांत हरलो म्हणून काय झाले, आमची मते जास्त आहेत, घाबरू नको, असे अंबाबाईच मला दृष्टांत देऊन सांगते. आम्ही काम करतोय; पण सद्य:स्थितीत पत्रकार कोणत्या दिशेने वातावरण नेतात, त्यावरच केंद्रात आमची सत्ता पुन्हा येणार, की नाही ते ठरणार आहे, अशी कबुली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज्यातही सरकार असेल, मी मंत्री असेन याचीही आता शाश्वती राहिली नाही, तरीही पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यास मी कटिबद्ध असेन, अशी ग्वाहीही पाटील यांनी दिली.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून रविवारी सायंकाळी कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या. ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार भारतकुमार राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अर्जुन टाकळकर, संदीप राजगोळकर, विजय केसरकर, अभिजित पाटील यांचा पुरस्काराने गौरव झाला. संपर्क अॅडव्हायजर्सचे सुधीर शिरोडकर व मोहन कुलकर्णी यांच्यासह महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक विजय जाधव, प्रा. शिवाजी जाधव, विजय टिपुगडे, मिलिंद यादव यांचा विशेष सन्मान झाला.
भारतकुमार राऊत म्हणाले, पत्रकारितेला फुटीरतेचा शापच आहे. तालुक्यापासून देशपातळीवर वेगवेगळ्या संघटनांमध्ये पत्रकार विभागला गेल्याने त्यांची ताकदही क्षीण झाली आहे. शक्तीच विभागली गेल्याने त्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी जटील बनत चालल्याची खंत वाटते.
प्रास्ताविक प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष समीर मुजावर, सचिव बाळासाहेब पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
पत्रकारांना कल्पनेपलीकडचे घर मिळेल
पत्रकारांच्या घरासाठी आपण कायमच आग्रही असून, कल्पनेच्या पलीकडचे घर त्यांना लवकरच मिळेल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. साडेआठ लाखांतील घरासाठी केंद्र व राज्य सरकारकडून पाच लाखांचे अनुदान मिळवून देत, अवघ्या चार लाखांतील घर पत्रकारांसाठी उपलब्ध करून देणारी योजना तयार करण्यात आली आहे. ‘म्हाडा’च्या निम्म्या किमतीत अशी २00 घरे बांधणार असून, त्यापैकी ५0 घरे ही सैनिकासह नामवंत पत्रकारांसाठी राखीव ठेवली जाणार आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.