‘वारणानगर’ तपासाचा केंद्रबिंदू सरनोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2017 01:19 AM2017-04-22T01:19:19+5:302017-04-22T01:19:19+5:30
पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम : सोमवारपासून चोरी प्रकरणातील तपासाला गती
कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणाचा तपासाचा केंद्रबिंदू फिर्यादी झुंझार सरनोबत स्वत: आहेत. कोल्हापूर पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये जे निष्पन्न झाले नाही, त्याची माहिती त्यांना आहे. त्यांना समोर बसवून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला जाईल. सध्या तपास प्राथमिक स्तरावर आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार यांच्याशी चर्चा करून आराखडा तयार करीत आहोत. सोमवार (दि. २४) पासून या प्रकरणाच्या तपासाला गती मिळेल, अशी माहिती या विभागाचे पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणात संगनमताने ९ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप करून खोटा तपास दाखविल्याप्रकरणी सांगलीच्या तत्कालीन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, पोलिस हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला (रा. जाखले, ता. पन्हाळा), प्रवीण भास्कर-सावंत (रा. वासूद, जि. सांगोला) यांच्याविरोेधात कोडोली पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल केले.
राज्य पोलिस दलातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने याचा तपास राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी राज्य गुन्हे अन्वेषणच्या पुणे विभागाकडे वर्ग केला. या विभागाचे पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी वारणानगर येथील घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. शुक्रवारी सकाळी ते पुण्याला रवाना झाले. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तपास अधिकारी अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा व सहायक पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याशी चर्चा करून दोन्ही गुन्हे दाखल असलेली तपासाची कागदोपत्री फाईल ताब्यात घेतली. आमच्या दृष्टीने या तपासाचा केंद्रबिंदू फिर्यादी सरनोबत आहे. चोरी प्रकरणातील संशयित आरोपी मैनुद्दीन मुल्ला गायब आहे. या विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार यांच्याशी चर्चा करून तपासाचा आराखडा तयार केला जाईल.
जुन्या गुन्ह्याची घेतली माहिती
शिक्षक कॉलनीच्या बिल्डिंग नं. ५ मधून दि. २८ फेब्रुवारी ते ११ मार्च २०१६ या कालावधीत चोरट्यांनी कटावणीने फ्लॅटचे कुलूप उचकटून तिजोरीतील रोख रक्कम ३ कोटी १८ लाख रुपये लंपास केल्याची फिर्याद बांधकाम व्यावसायिक झुंझार सरनोबत यांनी दिली आहे.
प्रत्यक्षात या बिल्डिंगमध्ये सव्वाचार कोटी रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले. बांधकाम व्यावसायिक सरनोबत यांच्या फिर्यादीतील तफावतीमुळे त्यांना नेमके पैसे किती ठेवले याची माहिती नव्हती. त्यानंतर एक वर्षाने त्यांनी रूममध्ये १४ कोटी रुपये होते, ते चोरीस गेल्याची फिर्याद दिली. पहिल्या गुन्ह्याचा तपास कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. (प्रतिनिधी)
मैनुद्दीनच्या सहकाऱ्यास अटक
शिक्षक कॉलनीच्या बिल्डिंग नं. ५ मधील रूम नं. ३ मध्ये चोरी करताना बाहेर टेहाळणी करणाऱ्या मैनुद्दीन मुल्ला याच्या तिसऱ्या साथीदाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली आहे.
संदीप बाबासो तोरस्कर (वय ३७, रा. बापट कॅम्प, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याने या चोरीतील २० लाख रुपये मैनुद्दीनकडून घेतले होते. संशयित विनायक महादेव जाधव (रा. भामटे) अशा तिघांनी मिळून ही चोरी केली होती.
सहा महिन्यांच्या चौकशीनंतरच लुटारू पोलिसांवर गुन्हा : नांगरे-पाटील
सांगली : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील शिक्षक कॉलनीतील सुमारे सव्वानऊ कोटी रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या सांगलीच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांसह पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध सहा महिन्यांच्या चौकशीनंतरच गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. हा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे सोपविला असून, तेच याचा पोलखोल करतील, असेही ते म्हणाले.
शुक्रवारी ते सांगली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की,संशयित पोलिसांविरुद्ध कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात, सव्वानऊ कोटी रुपयांची चोरी व अपहार असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वांना तातडीने निलंबित केले आहे. त्यांच्यावर यापेक्षाही वरिष्ठ स्तरारुन कठोर कारवाई होऊ शकते. सांगलीच्या जिल्हा पोलिस प्रमुखांना सर्वांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चोरीचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
वारणेच्या चोरीचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी करीत आहेत. मी स्वत: या तपासावर लक्ष ठेवून आहे. गुन्ह्यातील संशयितांना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागपूरहून परत आल्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून तपासासाठी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे.
- संजयकुमार, अप्पर पोलिस महासंचालक, सीआयडी