कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातील अस्त्याव्यस्त रिक्षा हटविल्या; परिसराने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 06:25 PM2019-11-25T18:25:57+5:302019-11-25T18:27:31+5:30
प्रवासी भाड्यात आर्थिक लुबाडणूक, कागदपत्र नसणे आणि शिस्तीचे पालन न करणाºया शहरातील रिक्षाचालकांवर कारवाईसत्र सुरू आहे. सोमवारी दिवसभर मोहिम राबविण्यात आली.
कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रस्त्यावर अस्त्याव्यस्त उभ्या राहणाऱ्या रिक्षा हटविल्याने सोमवारी या परिसराने मोकळा श्वास घेतला. यापुढेही हा परिसर असाच राहणार असून एकही रिक्षा नियमबाह्य फिरताना दिसणार नाही. सोमवारी पाच तर गेल्या चार दिवसात ३१ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
गेल्या चार दिवसांपासून रिक्षा व्यावसायीकांवर शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे बारकाईने लक्ष आहे. प्रवासी भाड्यात आर्थिक लुबाडणूक, कागदपत्र नसणे आणि शिस्तीचे पालन न करणाºया शहरातील रिक्षाचालकांवर कारवाईसत्र सुरू आहे. सोमवारी दिवसभर मोहिम राबविण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानक, बिंदू चौक, शिवाजी चौक, दसरा चौक, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, शिवाजी पेठेतील काही स्टॉपवर रिक्षाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पाच रिक्षांकडे कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रिक्षा स्टॉपवर एकेरी रांगेतून रिक्षाची वाहतूक सुरू आहे का, याची पाहणी करण्यात आली. रिक्षा चालकांचे लायसन्स, बॅच-बिल्ला, परमीट, फिटनेस, इ-मीटर सीलची तपासणी केली. काही रिक्षा एकेरी रांग सोडून आजूबाजूला उभ्या होत्या. त्या हटविण्यात आल्या. तसेच चालकांना समज दिली. पथकाने सोमवारी ५ रिक्षा ताब्यात घेतल्या. गेल्या चार दिवसात ३१ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. या रिक्षाचालकांकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याने त्या ताब्यात घेऊन पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आल्या. रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचे निरीक्षक बाबर यांनी सांगितले.
सीबीएसवरील राजर्षी शाहू महाराज डे-नाईट रिक्षा मित्र मंडळासमोर दिवसभर वाहतूक शाखेचे पोलीस थांबून होते. एकेरी रांगेत रिक्षा उभे राहून प्रवासी भाडे घेत होत्या. एकही चालक भाडे नाकारत नव्हता. नियमांचे काटेकोरपणे पालन होते की नाही, यावर पोलीस लक्ष ठेवून होते. रात्री दोन पर्यंत वाहतूक शाखेचे दोन कॉन्स्टेबल स्टेशन परिसरात बंदोबस्ताला असणार आहेत. ते रिक्षा चालक व प्रवाशांच्या नोंदी घेणार आहेत. स्टेशन रोडवर एकेरी रांगेत शिस्तबध्द रिक्षा उभ्या असलेचे चित्र पाहून परिसराने मोकळा श्वास घेतला.