केंद्रीय समिती आज, तर आरोग्यमंत्री उद्या घेणार आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:53+5:302021-07-15T04:18:53+5:30
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्ह दर काही केल्या खाली येत नसून मृत्युसंख्याही वाढतीच आहे. या पार्श्वभूमीवर सहसचिव आणि महाराष्ट्रासाठीचे कोविड ...
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्ह दर काही केल्या खाली येत नसून मृत्युसंख्याही वाढतीच आहे. या पार्श्वभूमीवर सहसचिव आणि महाराष्ट्रासाठीचे कोविड समन्वय अधिकारी कुणाल कुमार, राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राचे उपसंचालक डॉ. अजित शेवाळे, आरोग्य उपसंचालक डॉ. प्रणिल कांबळे, अखिल भारतीय वैद्यकशास्त्र संस्थेचे सहायक प्राध्यापक डॉ. सत्यजित साहू यांची केंद्रीय समिती बुधवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे गुरुवारी रात्री कोल्हापुरात येत असून, ते शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता कोरोनाचा आढावा घेणार आहेत. या दोन्ही बैठकांसाठी गेले दोन दिवस अधिकारी तयारी करीत आहेत.
चौकट -
उपाययोजनांकडे लक्ष
राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य कोल्हापुरात दीड महिन्यापूर्वी येऊन गेले; परंतु त्यानंतरही परिस्थिती काही सुधारली नाही. आता केेंद्रीय समिती येणार आहे. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्ण आणि मृत्यूसंख्येवर ही समिती काय रामबाण उपाय सुचविते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कोरोना चाचण्या, संपर्कशोध यासह रुग्णालयानुसार मृत्यू या सगळ्याचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.