रोजगार वाढवण्यात केंद्र सरकार अपयशी - डॉ. वंदना सोनाळकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 12:16 PM2023-12-14T12:16:07+5:302023-12-14T12:17:27+5:30
'ही तर अक्राळविक्राळ भांडवलशाही'
कोल्हापूर : खुल्या अर्थव्यवस्थेमुळे सध्याच्या काळात जरी हातात पैसे जास्त आले असे वाटत असले तरी सर्वसामान्यांना जगण्यासाठी ते पुरे पडत नाहीत, हे वास्तव आहे. तसेच रोजगार वाढवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरल्याचे मत अर्थशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. वंदना सोनाळकर यांनी व्यक्त केले.
अवी पानसरे व्याख्यानमालेमध्ये त्यांनी बुधवारी ‘जागतिक भांडवलशाहीची सद्य:स्थिती आणि भारताची अर्थव्यवस्था’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे संपादक डॉ. वसंत भोसले होते. यावेळी गतवर्षीच्या व्याख्यानमालेतील भाषणांचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी डॉ. सोनाळकर यांनी १९९१च्या आधीची परिस्थिती आणि खुल्या अर्थव्यवस्थेनंतरची स्थिती याचा आढावा घेत आपली निरीक्षणे मांडली. त्या म्हणाल्या, मोदी सरकारच्या काळात दोन धक्के भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करून गेले. एक म्हणजे नोटाबंदी. यामुळे अनेक छोटे उत्पादक आणि व्यापारी टिकू शकले नाहीत. तर कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने लॉकडाऊन केले गेले त्याचा विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. त्यानंतरच्या काळातही मंद गतीने राष्ट्रीय उत्पन्न वाढले. परंतु रोजगार निर्मितीसाठी सरकारने गुंतवणूक न केल्याने औद्योगिक रोजगार निर्मिती झाली नाही.
त्या म्हणाल्या, सध्या जी काही आकडेवारी सरकार सांगत आहे, त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा असा प्रश्न पडतो. सरकारी उद्योग, व्यवसायही खासगी होऊ लागले आहेत. खासगी विद्यापीठेही सुरू झाली. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर भांडवलशाहीने आपली मजबूत पकड ठेवली असून, त्यातून प्रसारमाध्यमेही सुटलेली नाहीत. एका बाजूला भांडवलदार आहे. त्याच्याच हातात पैसा आहे. त्याच्याच हातात तंत्रज्ञान आहे आणि त्याच्यासमोर मिळेल त्या किमतीला आपल्या श्रमाची विक्री केल्याशिवाय तरणोपाय नाही, असा बेरोजगार आहे.
सर्वसामान्यांसाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगार ही सरकारची जबाबदारी आहे असे १९८०च्या दशकाच्या शेवटापर्यंत मानले जात होते. नंतर मात्र परिस्थिती बदलत गेली. सरकारी शाळा बंद पडत आहेत, मुलींचे शिक्षण थांबत आहे. दर्जेदार आरोग्य सेवा मिळेनाशी झाली आहे. पंडित नेहरूंच्या चुका झाल्याचे तेच घिसेपिटे वाक्य सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवण्याचे काम सुरू झाले आहे.
प्रतिज्ञा कांबळे यांनी स्वागत केले. राहुल सुतार यांनी आभार मानले. यावेळी डॉ. अशोक चौसाळकर, व्यंकाप्पा भोसले, चंद्रकांत यादव, दिलीप पोवार, शिवाजीराव परुळेकर, डॉ. भारती पाटील, मेघा पानसरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ही तर अक्राळविक्राळ भांडवलशाही
कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘लोकमत’चे संपादक डॉ. वसंत भोसले म्हणाले, सध्या देशभरात अर्थविषयक जी धोरणे राबवली जात आहेत. त्याला फक्त ‘अक्राळविक्राळ भांडवलशाही’ असेच म्हटले पाहिजे. नेहरूंच्या काळात पैसा, तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ काहीच नव्हते. परंतु त्यातून त्यांनी अनेक संस्था, उद्योग उभारले. ज्यातून पुढे भारत घडत गेला. आता केवळ द्वेष पसरवणाऱ्या योजना, राजकारण, समाजकारण सुरू आहे. दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये महाराष्ट्राहून अधिक दारिद्र्य निमूर्लन झालेले असताना आपल्या नंदुरबार जिल्ह्यात अजूनही ५२ टक्के लोक दारिद्र्यात जगतात, हे भीषण वास्तव आहे. महाराष्ट्राने तर एकूणच कारभारात उलटी दिशा पकडली असून, सगळ्या राजकारण्यांची आता मिलीभगत झाली आहे.
आजचे व्याख्यान
वक्ते : संजय आवटे, संपादक, लोकमत, पुणे
विषय : प्रसारमाध्यमांची स्वायत्तता