कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा; 'हे' लाभ मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 12:23 PM2022-05-31T12:23:58+5:302022-05-31T12:25:37+5:30
प्रत्येक महिन्याला चार हजार रूपये देण्यात येणार असून पहिली ते १२ वीपर्यंत २० हजार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
कोल्हापूर : कोरोना महामारीत अनेक बालकांना आपल्या आई-वडिलांना गमवावे लागले आहे. अशा अनाथ मुलांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली.
जिल्ह्यातील १४ बालके आई-वडिलांविना पोरकी झाली आहेत. पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत मुलांना देण्यात येणारे लाभ, सेवा, अनाथ झालेल्या बालकांशी पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सहायक लेखाधिकारी के. बी. खरमाटे, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले, सदस्य ॲड. दिलशाद मुजावर, ॲड. संजय मुंगळे, बाल न्याय मंडळाचे ॲड. एस. पी. कुरणे, ॲङ रेवती देवाळपूरकर यांच्यासह बालके, त्यांचा सांभाळ करणारे पालक उपस्थित होते.
यावेळी १८ वर्षांवरील ओम गुरुनाथ हासुरे-पाटील, विनायक विष्णू यादव, राजवर्धन श्रीकांत दिवसे, किरण सुरेश खवरे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पीएम केअर कीट (स्नेह प्रमाणपत्र, विमाकार्ड, पासबुक) देण्यात आले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, मुलांनो तुमच्या आई-वडिलांचा मृत्यू भरून निघणार नाही पण देशातील प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत असेल. मनोरंजन, खेळाबरोबर मार्गदर्शक ठरणारी चांगली पुस्तके वाचा. खेलो इंडियामध्ये सहभागी व्हा, योगामध्ये सामील व्हा. स्वत:वर विश्वास ठेवा, हार मानू नका. पीएम केअरमधून मुलांच्या शिक्षणासाठी सरकारी किंवा खासगी शाळेत प्रवेश, पुस्तके, कपड्यांचा खर्च केंद्र सरकार करेल. व्यावसायिक शिक्षणासाठीही मदत करण्यात येईल.
हे लाभ मिळतील...
अनाथ मुलांची काळजी, संरक्षण, शिक्षणाद्वारे सक्षमीकरण करणे आणि १८ ते २३ वर्षांदरम्यान विद्यावेतन देण्यात येणार आहे. २३ व्या वर्षी एकरकमी १० लाख रूपये केंद्र सरकारचे आणि पाच लाख रुपये राज्य सरकारचे दिले जातील. प्रत्येक महिन्याला चार हजार रूपये देण्यात येणार असून पहिली ते १२ वीपर्यंत २० हजार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तांत्रिक शिक्षणासाठी ५० हजार रुपये शिष्यवृत्ती असून प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून दरवर्षी आरोग्य विमा असेल.