साखर निर्यात बंदीचा केंद्र सरकारचा निर्णय मुर्खपणाचा, माजी खासदार राजू शेट्टींचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 03:52 PM2022-05-26T15:52:40+5:302022-05-26T15:52:57+5:30
या धोेरणामुळे शेतकऱ्यांसह संपूर्ण उद्योग खड्ड्यात जाईल
कोल्हापूर : दिल्लीत कृषी भवनमध्ये अति शहाण्या लोकांच्या सल्ल्याने साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत मुर्खपणाचा आहे, अशी जोरदार टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. या धोेरणामुळे शेतकऱ्यांसह संपूर्ण उद्योग खड्ड्यात जाईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारने एक जून पासून साखरेच्या निर्यातीवर बंदीचा घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना शेतमालाच्या निर्यात बंदीच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले,केंद्र सरकारने रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली, त्याचा फटका गहू उत्पादकांना बसला. कांदा निर्यात बंदी केली, तो आता एक रुपया दराने शेतकऱ्यांकडून घेतला जात आहे. साखरेवर बंदी घातली तर गहू आणि कांद्यासारखी परिस्थिती होऊन बऱ्याच संकटानंतर आता कुठे सावरत असलेला साखर उद्योग पुन्हा मोडून पडणार आहे.
महाराष्ट्रात अद्यापही हजारो एकरातील ऊस गाळपाविना पडून आहे. ऊस गाळपाला जात नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन होणार आहे. गेल्या वर्षीची ८५ लाख टन साखर शिल्लक होती. यंदा ३५५ लाख टन साखर उत्पादित झालेली आहे. ४४० लाख टन साखरेपैकी २८० लाख टन साखर देशाला लागते. ८० लाख टन निर्यात झालेली आहे. देशात या क्षणाला ८० लाख टन साखर शिल्लक आहे. पुढच्या वर्षी देखील साखरेचे विक्रमी उत्पादन होणार आहे.
शिल्लक साखरेचे करणार काय
पुढील वर्षी देखील ११० लाख टन साखर निर्यात करावी लागणार आहे. निर्यात न झाल्यास मग शिल्लक साखरेचे काय करायचे असा प्रश्न साखर उद्योगासमोर निर्माण होणार आहे. पुढील वर्षीच्या निर्यातीचे आंतरराष्ट्रीय बाजारातील करार न झाल्यास साखर उद्योगावर गंभीर परिणाम होतील अशी भीतीही शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.