महापूराने झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 05:45 PM2019-08-30T17:45:23+5:302019-08-30T17:58:50+5:30
आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील गावांना महापूराचा जबरदस्त फटका बसला. यामुळे परिसरातील शेती, घरे, लघुद्योग, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने आज दिवसभरात अनेक ठिकाणांची पाहणी केली.
कोल्हापूर : आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील गावांना महापूराचा जबरदस्त फटका बसला. यामुळे परिसरातील शेती, घरे, लघुद्योग, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने आज दिवसभरात अनेक ठिकाणांची पाहणी केली.
महापूराने झालेल्या नुकसानीचा या केंद्रीय पथकाने गेल्या दोन दिवसात सातारा आणि सांगली जिल्ह्यातील आढावा घेतला. दोन वेगवेगळ्या केंद्रीय पथकांनी आज आंबेवाडी, चिखली गावांसह अर्जुनवाड, शिरोळ, नृसिंहवाडी, भैरेवाडी, इचलकरंजी, केर्ली, वाडी रत्नागिरी, राजाराम बंधारा, वडगणे, तसेच कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर, गवत मंडई, कुंभार गल्ली तसेच शिवाजी पूल परिसराला भेट देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला.
पॉलिसी अॅन्ड प्लॅनिंग, नवी दिल्लीचे सहसचिव डॉ. व्ही. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखालील या केंद्रीय पथकामध्ये नवी मुंबईचे अधिक्षक अभियंता संजय जयस्वाल होते. या केंद्रीय पथकात आर. पी. सिंग संचालक, कृषी मंत्रालय, नवी दिल्ली व व्ही. पी. राजवेदी, अवर सचिव, ग्रामविकास विभाग, नवी दिल्ली या सदस्यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, करवीरचे प्रांत सचिन इथापे, करवीरचे तहसीलदार सचिन गिरी, अप्पर पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. व्ही. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने अर्जुनवाड येथील वाहून गेलेली शेतजमीन, पिकांचे झालेले नुकसान, महावितरणचे झालेले नुकसान, प्राथमिक आरोग्य उप केंद्र, दलित वस्तीतील पडलेली घरे यांची पाहणी केली. यानंतर शिरोळ, नृसिंहवाडी, भैरेवाडी येथील यंत्रमागाचे नुकसान, सोयाबीन, ऊस पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी केर्ली-वाडी रत्नागिरी खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. तसेच शिवाजी पूलाच्या परिसराचीही पाहणी केली.